काश्‍मीर मुद्यावर रशियाचे पुन्हा भारताला समर्थन 

वृत्तसंस्था
Saturday, 14 November 2020

रोमन बाबुश्‍कीन यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, द्विपक्षीय मुद्दे ‘एससीओ’च्या कार्यक्रमपत्रिकेवर आणू नयेत, हा संघटनेच्या कराराचा भाग आहे.

नवी दिल्ली - काश्‍मीर प्रश्‍नावर रशियाने पुन्‍हा एकदा भारताचे समर्थन केले आहे. पाकिस्तानने काश्‍मीरसारखे द्विपक्षीय मुद्दे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) चर्चेत उपस्थित करु नयेत या भारताच्या भूमिकेला रशियाने पाठिंबा दिला आहे. असे करणे समूह सिद्धांताच्या मूलभूत तत्वाविरोधात होईल, असेही रशियाने म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रशियाच्या अध्यक्षतेखाली ‘एससीओ’ची शिखर परिषद आभासी पद्धतीने मंगळवारी (ता. १०) झाली. समूह सिद्धांताचे उल्लंघन करीत द्विपक्षीय मुद्दे अनावश्यकपणे ‘एससीओ’च्या व्यासपीठावरुन सातत्याने उपस्थित करण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिका केली होती. ‘एससीओ’त पाकिस्तानकडून काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करीत असल्याच्या संदर्भाने पंतप्रधानांनी ही टीका केली होती. रशियाच्या दूतावासाचे उपप्रमुख रोमन बाबुश्‍कीन यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, द्विपक्षीय मुद्दे ‘एससीओ’च्या कार्यक्रमपत्रिकेवर आणू नयेत, हा संघटनेच्या कराराचा भाग आहे. बहुस्तरिय संहकार्याच्या विकासासाठी अशा गोष्टी टाळण्याच्या स्पष्ट सूचना सर्व सदस्य देशांना दिल्या होत्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘अशा घटना यापुढे उद्‍भवू नयेत’ 
शांघाय सहकार्य परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असल्याने पाकिस्तानबाबतचा हा विषय उपस्थित करणार का, या प्रश्‍नावर बाबुश्‍कीन म्हणाले, भारत-पाकिस्तानमधील या वादात आमची भूमिका ठाम आहे. अशा प्रकारच्या घटना यापुढे उद्दभवणार नाही, अशी आशा आम्हाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia support for India again On the Kashmir issue