चीनला तोंड देण्यासाठी तयार व्हावे लागेल; एस जयशंकर यांचं मोठं वक्तव्य

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लडाख सीमेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे

नवी दिल्ली- लडाख सीमेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चीनला तोंड देण्यासाठी भारताला तयार व्हावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे आज भारत आणि चीनमध्ये 5 व्या दौऱ्याची चर्चा होत आहे. यामुळे परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याला महत्व आलं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चीनसोबत कोणत्या निर्णयाप्रत पोहोचणे सोपं नाही. भारताला त्याचा विरोध करावा लागेल आणि चीनला तोंड देण्यासाठी उभे राहावे लागेल, असं जयशंकर म्हणाले आहेत. चीनच्या सीमा भागातील हालचालींच्या परिणाम व्यापारावरही पडणार आहे. सीमेवर असणारी तणावाची स्थिती आणि दोन्ही देशांचे संबंध याला वेगवेगळे पाहिले जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत. 

चीन पुन्हा कुरघोड्या करण्याच्या तयारीत; अणू बॉम्बर विमानांची दिशा लडाख परिसराकडे

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनने सीमा भागातील आपले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले असले तरी ड्रॅगन आपले सैन्य मागे घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावार पाचवी बैठक होत आहे. 

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधाबाबतची भाष्य केले. अमेरिकेसोबत भारताचे संबंध बदलत आहेत. भारत आणि अमेरिका हे परंपरागत मित्र नाहीत, पण आता संबंध चांगलेच सुधारले आहेत. चीनसोबत भारताचे संबंध द्विपक्षीय आहेत, असं  ते म्हणाले आहेत. 

वास्तवापासून मोदी सरकार दूरच

दरम्यान, 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने आपली जीवितहानी झाल्याचं मान्य केलं होतं, पण मृत जवानांचा आकडा सांगण्यास नकार दिला होता. तेव्हापासून उभय देशांतील संबंध तणावाचे बनले आहेत. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात जवानांची जमवाजमव केली आहे. शिवाय दोन्ही देशांनी लष्करी स्तरावर चर्चा सुरु केली आहे. सद्या पाचव्या दौऱ्याची चर्चा सुरु असून या मागील चर्चामध्ये चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. चीनने काही भागातून सैन्य मागे घेतले आहे, तर काही भागांतून सैन्य मागे घेण्यास टाळाटाळा करत आहे. त्यामुळे उभय देशातील संबध चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s jayshankar big comment on china-india situation