esakal | प्रियांका गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर 3 तासातच सचिन पायलट यांची हकालपट्टी?
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot with priyanka gandhi

सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी फोनवरून थेट चर्चा केली होती.

प्रियांका गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर 3 तासातच सचिन पायलट यांची हकालपट्टी?

sakal_logo
By
सूरज यादव

जयपूर - राजस्थानात काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. काँग्रेसनं सचिन पायलट यांच्यासह त्यांना साथ देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्रतेची नोटिसही पाठवली आहे. याविरोधात सचिन पायलट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी फोनवरून थेट चर्चा केली होती. त्यानंतरच तीन तासांनी सचिन पायलट यांच्या हकालपट्टीची कारवाई पक्षाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हे वाचा - लंडनमध्ये सचिन पायलट यांची काश्मिरी कन्येसोबत फुलली प्रेमकहाणी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत सचिन पायलट यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला होता. मात्र गेहलोत यांनी शक्तीप्रदर्शन करत सचिन पायलट यांचे बंड मोडून काढले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सचिन पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अजुनही पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असंही काँग्रेस नेते म्हणत आहेत. तसंच या मागे भाजपचा हात असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. 

दरम्यान, आमदार फोडोफोडीच्या आरोपानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, आमदार भंवरलाल शर्मा आणि संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने काही ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) याची दखल घेतली. गुरुवारी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आमदार भंवरलाल आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत  यांच्यावर आरोप केले होते. 

हे वाचा - सचिन पायलट यांच्या बंडखोरीला आहे 'वारसा'; वडिलांनीही उचलला होता बंडाचा झेंडा

सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत गटबाजी यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भंवर लाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह हेसुद्धा सचिन पायलट यांच्या गटातील आहेत. त्यांचेही प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आलं असून दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एका कथित ऑडिओ टेपमधील आमदारांच्या फोनवरील बोलण्याच्या आधारे संबंधितांवर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.