पाटण्यात 'फॉर्मेलिन'युक्त माशांची विक्री

उज्ज्वलकुमार
बुधवार, 16 जानेवारी 2019

कठोर दंड 

पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या माशांची साठवणूक अथवा विक्री करता येणार नाही, फॉर्मेलिनयुक्त मासे विकताना कुणी आढळून आल्यास त्याला सात वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा आणि दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. पाटण्याचे जिल्हाधिकारी या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलिन या घातक रासायनिक पदार्थाचे अंश आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील माशांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, पुढील पंधरा दिवस या माशांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, ती केवळ पाटण्यापुरती मर्यादित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजयकुमार म्हणाले, की याआधी आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून येथे विक्रीसाठी आलेल्या माशांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले असता हे मासे खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आले होते. पाटण्यातील विविध बाजारपेठांमधून माशांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी कोलकाता येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. दरम्यान ही बंदी केवळ पंधरा दिवसांपुरतीच मर्यादित असली तरीसुद्धा पुढील निर्णय आरोग्य विभागच घेईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Sale of Formaline fishes in Patna