सलमान खानला दिलासा; जामीन मंजूर

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

सलमानला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. सलमानवर बॉलिवूडमध्ये सुमारे 500 कोटी रुपये लागलेले असून, या निर्णयामुळे निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

जयपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला असून, आज (शनिवार) जोधपूर सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर सलमान कारागृहाबाहेर येणार आहे. 

सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आज सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि त्याला जामीन मंजूर केला आहे. सलमानला शुक्रवारी जामीन मिळू शकला नव्हता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय शनिवार (ता.7) पर्यंत राखून ठेवला होता. आज त्याला जामीन मंजूर केल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. 

जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी सलमानला 5 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयामध्ये सलमानची बाजू मांडणारे वकील हस्तीमल सारस्वत आणि महेश बोडा यांनी कमकुवत पुरावे आणि अशिलाच्या चांगल्या चारित्र्याचा दाखला दिला. या दोन घटकांच्या आधारे सलमानला जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील पोकर राम यांनी सलमानच्या जामिनाला विरोध केला होता. 

सलमानला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. सलमानवर बॉलिवूडमध्ये सुमारे 500 कोटी रुपये लागलेले असून, या निर्णयामुळे निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Salman Khan gets bail in Blackbuck Poaching case