तिकीट वाटपावरून पुन्हा 'यादवी'

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

लखनौ - समाजवादी पक्षात उमेदवार यादीवरून पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी 325 जणांची उमेदवार यादी जाहीर करत अखिलेश गटाचे पंख कापल्यानंतर आज मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आपला सवतासुभा मांडला. "तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, मी तिकीट देतो' असे आदेश त्यांनी आपले समर्थक आमदार आणि मंत्र्यांना दिले असून 167 उमेदवारांची नवी यादीही त्यांनी जाहीर केल्याचे समजते.

लखनौ - समाजवादी पक्षात उमेदवार यादीवरून पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी 325 जणांची उमेदवार यादी जाहीर करत अखिलेश गटाचे पंख कापल्यानंतर आज मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आपला सवतासुभा मांडला. "तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, मी तिकीट देतो' असे आदेश त्यांनी आपले समर्थक आमदार आणि मंत्र्यांना दिले असून 167 उमेदवारांची नवी यादीही त्यांनी जाहीर केल्याचे समजते.

अखिलेश यांच्या या पवित्र्यामुळे समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे. आता अखिलेश यांनी घोषित केलेले उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतात. खुद्द अखिलेश त्यांच्यासाठी प्रचार करण्याची शक्‍यता आहे.
आज अखिलेश यांनी "5- कालिदास मार्ग' येथील आपल्या निवासस्थानी समर्थक मंत्री आणि आमदारांची बैठक घेतल्यानंतर आपले दु:ख नेताजींच्या कानी घातले. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या अनेक मंत्र्यांनी आपली व्यथा अखिलेश यांच्यासमोर मांडली. अमरसिंह यांनीच आपले तिकीट कापले, बेनीप्रसाद वर्मा यांनीही शिवपाल यांच्या माध्यमातून माझ्याविरोधात कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप मंत्री अरविंदसिंह गोप यांनी केला आहे.

प्रचारातून माघार
मुलायम यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आपल्या समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही हे लक्षात येताच, अखिलेश यांनी बुंदेलखंडमधील प्रचारातून अंग काढून घेतले. चांगले काम करणाऱ्या उमेदवारांनाही तिकीट नाकारण्यात आल्याने अखिलेश नाराज झाले होते. यानंतर अखिलेश यांनी शिवपाल समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश आवास विकास परिषदेच्या उपाध्यक्षा सुरभी शुक्‍ला आणि राजकीय निर्माण निगमचे सल्लागार असलेले त्यांचे पती संदीप शुक्‍ला यांची तातडीने उचलबांगडी केली.

अखिलेश यांचा आक्षेप
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा भाऊ सिग्बातुल्ला अन्सारी याच्या उमेदवारीला अखिलेश यांनी आक्षेप घेतला होता; पण मुलायमसिंह यांनी तो फेटाळून लावला. वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांनाही उमेदवारी दिली जाऊ नये, असे अखिलेश यांचे मत होते. पण, त्याचाही विचार करण्यात आला नाही. मुलायमसिंह यांनी कॉंग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी करण्यास नकार दिल्याने अखिलेश संतापले होते. शिवपाल यांनीच महाआघाडीत खोडा घातल्याचे बोलले जाते.

बैठकीत नेमके झाले काय?
मुलायमसिंह यांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आज समाजवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्या, अखिलेश यांनी मुलायमसिंह यांची भेट घेऊन त्यांना आपली नाराजी कळविली. मुलायमसिंह आणि अखिलेश यांच्यात चर्चा सुरू असताना शिवपाल यादव देखील तेथे हजर झाले. या वेळी तिन्ही नेत्यांनी आपआपली मते मांडली. आपल्या समर्थकांची तिकिटे का कापण्यात आली असा प्रश्‍न अखिलेश यांनी केला असता मुलायमसिंह म्हणाले की, ते पराभूत होणार होते. यावर अखिलेश यांनी त्यांच्या विजयाची हमी मी दिली असती, तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवायला हवा होता असे सांगितले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मंत्री आणि आमदारांचे दु:ख अखिलेश यांनी नेताजींना ऐकविले. या वेळी रामगोविंद चौधरी आणि अरविंदसिंह गोप यांनी दूरध्वनीवरून आपले म्हणणे मांडले. यावर नेताजींनी एका सर्वेक्षण अहवालाचा संदर्भ देत हे सगळे उमेदवार पराभूत होणार होते असे सांगितले. तेव्हा अखिलेश यांनी सर्वेक्षणावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. आपण केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे सर्व उमेदवार विजयी होत असल्याचे अखिलेश यांनी दाखवून दिल्यानंतर मुलायम यांनी काही नावांवर पुनर्विचार करण्याची तयारी दर्शविली.

Web Title: Samajwadi candidate list declared