द्राविडी अस्मितेचा चेहरा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

करुणानिधी यांच्या निधनाने एक राजकीय वादळ विसावले आहे. आधी जयललिता आणि आता करुणानिधी यांच्या निधनामुळे तमिळनाडूच्या राजकारणातील संक्रमणपर्व सुरू झाले आहे. 

अस्मिताधारित प्रादेशिक पक्षांनी राज्यात आपले पक्के पाय रोवून देशाच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका स्वीकारायला सुरवात केली ती प्रामुख्याने दोन दशकांपूर्वी. आघाडीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कमालीचे वाढले. या राजकीय प्रवाहाचा वेध घेताना पहिले नाव कोणाचे समोर येत असेल तर ते एम. करुणानिधी यांचे. तमिळनाडूच्या राजकारणावर सहा दशके अधिराज्य तर त्यांनी गाजवलेच; पण द्राविडी अस्मितेचा ते चेहेराच बनून गेले. त्यांच्या जाण्याने एक वादळ विसावले.

तमिळनाडूच्या राजकारणात एम. जी. रामचंद्रन, जे. जयललिता आणि करुणानिधी यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. जयललितांच्या निधनानंतर तमिळनाडूतील राजकारण पुरते सावरलेले नाही किंवा त्यांच्या राजकीय गणितांची पुनर्मांडणी पूर्ण झालेली नसतानाच करुणानिधींचे निधन झाल्याने राज्याचे राजकारण पुरते ढवळून निघणार आहे. तमिळ राजकारणाचा, द्रविडी चळवळीचा आणि दक्षिणेतील हिंदीविरोधी आंदोलनाचा इतिहास करुणानिधींच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण ठरेल. मिसरूड फुटण्याआधीच करुणानिधींनी आपले संघटनकौशल्य, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे प्रत्यंतर दिले होते. शालेय वयात "मनावर नेशन'सारखे हस्तलिखित सुरू करून आपले विचार लोकांपर्यंत पोचवणाऱ्या करुणानिधींनी पत्रकारितेवर आपल्या प्रागतिक विचारांचा ठसा उमटवला. "मुरसोली'सारखे दैनिक सुरू करून त्याद्वारे आपला पक्ष "द्रविड मुन्नेत्र कळघम'चे (द्रमुक) जनतेच्या अंतःकरणात बीजारोपण केले, त्याला घट्ट जनाधार मिळवून देत पक्षाची विचारधारा पुढे नेली.

करुणानिधींची मूळ वृत्ती खरे तर सुधारणावादी चळवळीची. चित्रपटासाठी लेखन करताना त्यांनी जमीनदारी, विधवा पुनर्विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिक विषयांना हात घातला. प्रसंगी त्यामुळे त्यांच्या चित्रपटांवर बंदीची कुऱ्हाड आली; पण आपल्या विचारधारेपासून ते तसूभर दुरावले नाहीत. ब्राह्मणी संस्कृतीविरोधातील द्रविड चळवळीला बळ देण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. हिंदीविरोधी आंदोलनाने तमिळनाडूत जोर धरल्यानंतर त्याच्या अग्रभागी नेत्यांच्या बरोबरीने करुणानिधी रस्त्यावर उतरले. कट्टर हिंदीविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. सामाजिक, राजकीय जीवनातील या वाटचालीनेच त्यांना अकरा वेळा तमिळनाडू विधानसभेत पाठवले. पाच वेळा ते मुख्यमंत्री झाले.

आघाड्यांच्या राजकारणात, त्यातही दिल्लीतील सत्तेशी जमवून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे एकविसाव्या शतकात त्यांचा पक्ष राज्यात आणि दिल्लीतील सत्तेत सहभागी झाला. आघाड्यांच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांना आलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी सत्तेची गणिते मांडत "द्रमुक'च्या पदरात खूप काही पाडून घेतले. एम. जी. रामचंद्रन यांचा तमीळ जनतेवर करिष्मा होता तो लोकप्रिय, प्रभावी अभिनेता म्हणून, त्याच्या बळावरच त्यांनी अण्णा द्रमुकची मुहूर्तमेढ रोवली आणि करुणानिधींच्या राजकारणाला स्वल्पविराम मिळतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. तथापि, रामचंद्रन यांच्या अकाली जाण्याने करुणानिधींच्या झाकोळलेल्या राजकारणाने पुन्हा जोम धरला. रामचंद्रन यांच्या राजकारणातील शिष्या, जे. जयललिता यांनी करुणानिधींसमोर आव्हान उभे केले. मात्र, खुशमस्करांच्या कोंडाळ्यातील जयललिता यांना त्याची किंमत मोजावी लागली, सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. तमिळनाडूत जयललिता विरुद्ध करुणानिधी असे सूडनाट्यांचे राजकारण जनतेने अनुभवले. उभय नेत्यांना विविध प्रकरणातील आरोपांनी तुरुंगाची हवा खावी लागली. चिखलफेकीने प्रतिमाही मलिन झाली.

तमिळनाडूत जनतेला आमिषांचे गाजर दाखवत, विविध प्रकारच्या क्‍लृप्त्या लढवत, एकमेकांशी झुंजणारे हे नेते आपला वर्चस्ववादाचा लढा देत राहिले. या सर्व परिस्थितीशी झुंजत करुणानिधी "द्रमुक'ला सत्तेवर आणण्याची पराकाष्ठा करत राहिले. आघाडीच्या राजकारणाचे महत्त्व वाढत गेले, तसे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा वावर वाढत गेला. वादग्रस्त वक्तव्यांनी, भ्रष्टाचाराच्या आरोपांनीही करुणानिधींची पाठ सोडली नाही. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमचे (एलटीटीई) पुरस्कर्ते, त्याचा म्होरक्‍या प्रभाकरन याच्याविषयी विशेष आत्मीयता बाळगणारे, अशी त्यांची प्रतिमा होती. जयललितांनी मुख्यमंत्री असताना भल्या पहाटे करुणानिधींची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निवासस्थानातून उचलबांगडी केली होती. 

कॉंग्रेस व भाजप देशव्यापी असले तरी तमिळनाडूत द्रमुक वा अद्रमुक यापैकी कोणत्या तरी पक्षाशी हातमिळवणी केल्याशिवाय त्यांना राज्यात राजकारण करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, द्रमुक करुणानिधींच्या कुटुंबीयांच्या घराणेशाहीत रुतलेला आहे. पुत्र स्टॅलिन यांना करुणानिधींनी आपला वारस निश्‍चित केले. तथापि, करुणानिधींच्या जाण्याने तमीळ राजकारणात आणि द्रविड चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याची क्षमता स्टॅलिन यांच्यात आहे की नाही, या प्रश्‍नाला त्यांना कृतीतून उत्तर द्यावे लागेल. निवडणुका तोंडावर येऊ पाहत असताना, अण्णा द्रमुक अस्तित्वासाठी धडपडत असतानाच, स्टॅलिन "द्रमुक'ला पुढे नेण्यासाठी कोणती पावले उचलतात, की आघाडीच्या राजकारणात भाजप की भाजपेतर पक्षाशी हातमिळवणी करतात, हे पाहावे लागेल. तथापि, तमीळ राजकारणात राजकीय मंचावर परिवर्तनाचे, संक्रमणाचे पर्व जयललिता आणि आता करुणानिधी यांच्या निधनामुळे सुरू झाले आहे, हे निश्‍चित.

Web Title: sampadkiy article in sakal on M karunanidhi