Solar Studies : मानवाच्या कल्याणासाठी सौर अभ्यास आवश्‍यक

जगातील सर्वात अत्याधुनिक सौरवेधशाळा अर्थात ‘आदित्य - एल वन’ गंतव्य स्थानावर पोचली आहे. लवकरच ही वेधशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल.
Solar Studies
Solar Studiessakal

जगातील सर्वात अत्याधुनिक सौरवेधशाळा अर्थात ‘आदित्य - एल वन’ गंतव्य स्थानावर पोचली आहे. लवकरच ही वेधशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. त्यातून विज्ञानाला नक्की चालना कशी मिळणार? सूर्याचा अभ्यास एवढा महत्त्वाचा का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मोहिमेतील प्रमुख सौरभौतिकशास्त्रज्ञ डॉ. दिब्येंदू नंदी याच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - सूर्याचा अभ्यास एवढा महत्त्वाचा का?

उत्तर - संपूर्ण जीवसृष्टीचा नव्हे तर सूर्यमालेतील सर्व ग्रहांचा तारणहार हा सूर्यच आहे. जिज्ञासू मानवासाठी सूर्य हा सर्वात जवळचा आणि सर्वाधिक परिणाम करणार खगोलीय घटक आहे. ज्याच्या प्रकाशकिरणांमुळे केवळ पृथ्वीच्या हवामानावर परिणाम होतो असे नाही तर अवकाशातील वातावरणही बदलते. आजचे आधुनिक जग पूर्णपणे कृत्रिम उपग्रहांवर अवलंबून असून, त्यासाठी अवकाशीय वातावरणातील बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत.

येत्या काळात अवकाशीय वातावरणातील बदलांचा अभ्यास आणि पूर्वानुमानाची गरज उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. मानवाच्या कल्याणासाठी आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या संरक्षणासाठी सूर्याचा अभ्यास अनिवार्य आहे. जसे पृथ्वीवर मॉन्सूनच्या पूर्वानुमानाची गरज आहे तशी अवकाशात तेथील वातावरणातील बदलांच्या अंदाजांची गरज आहे. हळूहळू अवकाशीय वातावरणाचा अभ्यास करत त्यासाठीचे एक प्रारूप विकसित करणे गरजेचे आहे.

‘आदित्य -एल वन’ निर्धारित जागेवर पोहोचला आहे. आता पुढे काय होणार?

- आपल्या गंतव्य स्थानावर पोचण्यापूर्वीच ‘आदित्य’वरील सात पैकी चार उपकरणे कार्यरत झाली आहे. उर्वरित तीन उपकरणे आता कार्यरत केली जातील. ज्यामध्ये ‘व्हीईएलसी’, ‘ॲस्पेक्स’, ‘डिजिटल मॅग्नॉटोमीटर’चा समावेश आहे. या उपकरणांची चाचणी आणि कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरूवातीला केले जाईल. जेव्हा या सातही उपकरणांतून पृथ्वीकडे निरीक्षणे पाठविले जातील, त्यानंतर खऱ्या अर्थाने सौरविज्ञानातील नवे रहस्य उलगडण्यास सुरवात होईल.

या प्रक्रियेसाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जगभरातील सौरखगोल अभ्यासकांसाठी ‘आदित्य -एल वन’ ही खूप मोठी संधी असून, भारतीय शास्त्रज्ञांनी क्षमता सिद्ध केली आहे. यातून आता परस्पर आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळेल.

Solar Studies
Aditya L1 Mission : 'एल-1' लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला 'आदित्य'; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! पंतप्रधानांनी केली पोस्ट

‘आदित्य -एल वन’ मुळे सूर्याबद्दलची कोणती नवी माहिती मिळेल?

- सौरवादळांचा थेट परिणाम पृथ्वीच्या बाह्य वातावरणावर होतो, याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. याचा थेट धोका कृत्रिम उपग्रहासह जमिनीवरील विद्युतवहन प्रणालीला देखील असतो. आजही सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरस्फोट आणि सौरवादळांच्या निर्मितीबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल आहे. या मूलभूत प्रश्नाचा वेध शास्त्रज्ञ घेत आहे.

सौरस्फोटांची निर्मिती आणि त्यातील कणांचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास समजावून घेण्याचा जगभरातील शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. सूर्याचे विज्ञान उलगडण्याबरोबरच सौरवादळांचा अंदाज बांधण्यासाठी ‘आदित्य’ मदत करेल. सौरवादळांचा वेग, तीव्रता आणि दिशेबद्दल ‘व्हीएलसी’ हे उपकरण माहिती देईल. सौरवादळांतील ऊर्जेचा वेध घेण्यासाठी ‘सोलेक्स’ हे उपकरण मदत करेल; तर ‘हिलीऑस’ या उपकरणामुळे त्याची तीव्रता लक्षात येईल.

‘सूट’नावाचे इमेजिंग उपकरण सौरडाग आणि स्फोटांचे निरीक्षण करेल. ज्यातून अतिनील तरंगलांबीतील सूर्याच्या प्रतिमांचा अभ्यास करता येईल. विशेष म्हणजे लॅग्रांज (एल वन) बिंदूचेही महत्त्व आहे. पृथ्वीपासून सूर्याकडे जाणाऱ्या मार्गावर १५ लाख किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. जेथे पृथ्वी आणि सूर्याचे गुरूत्वीय बल एकसमान असते.

‘एल वन’ बिंदूमुळे आपल्याला अगदी काही सेकंद आधी माहिती मिळेल. त्या ठिकाणांवरील चुंबकीय प्लाझ्माची घनता, कणांचे वर्तन आणि वेगाबद्दलची माहिती मिळेल. पूर्वसूचनेपेक्षाही स्थानिक वातावरणाची माहिती यातून मिळेल.

नासा आणि युरोपियन अवकाश संस्थेच्याही वेधशाळा तेथे आहेत. त्याहून `आदित्य - एल वन’ वेगळा कसा?

- अमेरिकेच्या नासा बरोबरच युरोपीय अवकाश संस्थेची ‘साहू’ वेधशाळा ‘एल वन’ या बिंदूवर आहे. ‘नासा’ची वेधशाळा त्या ठिकाणच्या स्थानिक वातावरणाचा अभ्यास करत आहे. ज्यामध्ये सौरवायूच्या गुणधर्माच्या मोजमापाचा समावेश आहे. युरोपीय वेधशाळा सौरस्फोटातून बाहेर पडणाऱ्या ‘कोरोनोल मास’चा अभ्यास करत आहे.

याच्या तुलनेत भारताची ‘आदित्य-एल वन’ वेधशाळा अत्यंत अत्याधुनिक असून, त्यामध्ये सर्व प्रकारची उपकरणे आहेत. सूर्याच्या निरीक्षणाबरोबरच निघणारे सौरवादळे आणि सौरस्फोटांचा अभ्यास एकाच वेळी करता येतो. तसेच ‘एल वन’ बिंदूवरील अवकाशीय हवामानाचा अभ्यास व सौरवादळांची पृथ्वीवर पोचणाऱ्या गुणधर्मांवर ते प्रकाश टाकते.

Solar Studies
Aditya L1 Mission : लॅग्रेंज पॉइंट काय असतात? 'आदित्य'साठी या पॉइंटवर पोहोचणं का गरजेचं आहे? जाणून घ्या

सौरभौतिकशास्त्राला ‘आदित्य - एल वन’ चा काय फायदा?

- सूर्याच्या प्रभामंडळाच्या आत आपल्याला डोकावता आलेले नाही. तेथूनच सौरस्फोटांची निर्मिती होत असून, त्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य’चा मोठा उपयोग होणार आहे. सौरस्फोटांची निर्मिती आणि त्यांच्या प्रवासाबद्दल महत्त्वाचे धागेदोरे ‘आदित्य’ मोहिमेतून हाती लागतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. अतिनील किरणांचा पृथ्वीच्या वातावरणावर दूरगामी परिणाम होतो. त्यात सातत्याने बदलत होत असून, यामागचे कारण उलगडण्यासही चालना मिळेल. सौरभौतिकशास्त्राच्या अभ्यासात या मोहिमेमुळे नवी बाजू उलगडली जाणार आहे.

(डॉ. दिब्येंदू नंदी यांचा ‘आदित्य -एल वन’ मोहिमेत महत्त्वाचा सहभाग आहे. कोलकता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत ते प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com