
संजय राऊत यांनी म्हटलं की, आज देशात जो सत्य बोलतो, लिहतो त्याला गद्दार, देशद्रोही असं म्हटलं जातंय. सरकाराल जो प्रश्न विचारेल, त्याला देशद्रोही ठरवून त्याच्यावर खटला दाखल केला जातोय.
नवी दिल्ली : संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनावरुन दोन्हीही सभागृहात आज जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. गुरुवारी देखील काँग्रेस, द्रमुक सहित अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार आवाज उठवला होता, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात आलं होतं. राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
संजय राऊत यांनी म्हटलं की, आज देशात जो सत्य बोलतो, लिहतो त्याला गद्दार, देशद्रोही असं म्हटलं जातंय. सरकाराल जो प्रश्न विचारेल, त्याला देशद्रोही ठरवून त्याच्यावर खटला दाखल केला जातोय. खासदार संजय सिंह, पत्रकार पद्मश्री राजदीप सरदेसाई, युनायटेड नेशनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले, माजी कंद्रीय मंत्री आणि खासदार शशी थरुर आज देशद्रोही ठरवले गेलेत. सिंघू बॉर्डरवर रिपोर्टींग करणारे मनजीत सिंह, धर्मेंद्र सिंह आणि अशा अनेक पत्रकार आणि लेखकांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवलं गेलं आहे.
हेही वाचा - ट्रॅक्टर परेड हिंसेची घटना 'US कॅपिटॉल हिंसे'सारखीच! : परराष्ट्र मंत्रालय
पंतप्रधानांना हे बहुमत देश चालवायला मिळालं आहे. मात्र अंहकाराने बहुमत चालत नसंत. शेतकरी आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा कट आहे. हे देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याचं आहे, असं त्यांनी म्हटलं. पुढे त्यांनी विचारलं की, लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणार दिप सिद्धू कुणाचा माणूस आहे? तो फरार आहे. मात्र, दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना अटक झालीय. 100 हून अधिक आंदोलक लोक बेपत्ता आहेत आणि हक्कासाठी लढणारे देशद्रोही ठरवले जाताहेत.
पुढे संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटलं की, सध्या देशात देशभक्त कोण आहे? तर ज्याला आधीपासूनच बालाकोटबद्दल माहिती होतं असा अर्णब गोस्वामी आणि कंगणा राणावत. या माणसाला सरकारने आश्रय दिलाय याबाबत सरकारला लाज वाटायला हवी. राष्ट्रपतींनी अभिभाषणात म्हटलं होतं की जेंव्हा जेंव्हा भारत एकजूट झालाय तेंव्हा त्याने अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. मात्र जेंव्हा शेतकरी एकजूट होतोय त्याला देशद्रोही ठरवलं जातंय. आपण त्याला रोखण्यासाठी मोठे खिळे बॅरिकेड्स लावताय. जर हे लडाखच्या सीमेवर लावले असते तर चीन भारतात घुसला नसता.हे आंदोलन जोवर जिवंत आहे तोवर हिंदूस्तान जिंदाबाद रहेगा कारण शेतकऱ्यांचं आंदोलन ही देशाची ताकद आहे.