'डोसा किंग'ची एक्‍झिट; 'सर्वना भवन'चे संस्थापक राजागोपाल यांचे निधन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

विवाहाची इच्छा 
देशभर डोसा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजागोपाल यांना 2001 मध्ये त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी शांताकुमार याच्या खून प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. राजागोपाल यांना शांताकुमार याची पत्नी जीवज्योती यांच्याशी विवाह करायचा होता. जीवज्योती आपली तिसरी पत्नी बनावी असे त्यांना वाटत होते. राजगोपाल यांनी अधिकृतरित्या जीवज्योतीला मागणी घातल्यानंतर त्यांनी याला नकार दिला होता. यानंतर राजागोपाल यांनी शांताकुमार यांचा खून केला होता. 

चेन्नई : "सर्वना भवन' या जगप्रसिद्ध साखळी रेस्टॉरंटचे संस्थापक पी. राजागोपाल यांचे आज येथील रूग्णालयात निधन झाले, मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वत:च्याच हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी प्रिन्स शांताकुमार याच्या खून आणि अपहरणप्रकरणात ते प्रथम आरोपी होते. मद्रास उच्च न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्यासह अन्य पाचजणांना याच प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मार्चमध्ये या शिक्षेवर शिक्कामोर्तब करत त्यांना 7 जुलैपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला हरल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता, यामुळे ते आणखीनच खचले होते अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

मागील आठवड्यामध्ये रूग्णवाहिकेतूनच त्यांना न्यायालयाच्या कॉम्पलेक्‍समध्ये आणण्यात आले होते. शरण येताच राजागोपाल यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना सरकारी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यास आणखी काही काळ अवधी देण्यास नकार दिल्यानंतर राजागोपाल यांच्यासमोर शरण येण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. राजागोपाल यांची प्रकृती आणखी खालवल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली. 

विवाहाची इच्छा 
देशभर डोसा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजागोपाल यांना 2001 मध्ये त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी शांताकुमार याच्या खून प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. राजागोपाल यांना शांताकुमार याची पत्नी जीवज्योती यांच्याशी विवाह करायचा होता. जीवज्योती आपली तिसरी पत्नी बनावी असे त्यांना वाटत होते. राजगोपाल यांनी अधिकृतरित्या जीवज्योतीला मागणी घातल्यानंतर त्यांनी याला नकार दिला होता. यानंतर राजागोपाल यांनी शांताकुमार यांचा खून केला होता. 

शिक्षा वाढली 
सत्र न्यायालयाने 2004 मध्ये राजागोपाल यांना खून प्रकरणी दोषी ठरविल्यानंतर त्यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. पुढे याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती पण येथेही न्यायालयामध्ये 2009 मध्ये शिक्षेत वाढ करत तिचे रूपांतर जन्मठेपेत केले होते. राजगोपाल यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती पण तेथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saravana Bhavan founder P Rajagopal dies after suffering heart attack