पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक | Satyapal Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्यपाल मलिक
पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक

पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक

नवी दिल्ली-चंडीगड : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांचे भाजप (BJP) नेतृत्वावरील हल्ले सुरूच असून आज त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘उद्धट’ असे म्हटले आहे. ‘शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो पण आमची शाब्दिक चकमक होऊन बैठक पाच मिनिटांमध्ये संपल्याचे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

हरियानातील दादरी येथील कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘‘ शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो तेव्हा पाच मिनिटांमध्ये माझा त्यांच्याशी वाद सुरू झाला. मोदी खूप घमेंडीत बोलत होते. या आंदोलनामध्ये पाचशे लोक मरण पावल्याचे मी त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की ते शेतकरी काही माझ्यासाठी मेले आहेत का? यावर मी देखील त्यांना तुमच्यासाठीच ते मेले असल्याचे सांगितले.

हेही वाचा: चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

तुम्ही राजा होऊन बसले आहात असे मी त्यांना सुनावले. यानंतर माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे त्यांनी मला अमित शहा यांना भेटायला सांगितले नंतर मी शहांना देखील भेटलो.’’ शेतकऱ्यांच्या इतर सगळ्याच गोष्टी बिघडून टाकण्याऐवजी त्यांच्या मालाला किमान हमी भाव देणे गरजेचे असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

अन्यथा मोदी, शहांनी माफी मागावी : सुरजेवाला

मलिक यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसने मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. मलिक खोटे असतील तर त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा मोदी-शहांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असे खुले आव्हान काँग्रेसने दिले आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा हरियानातील चरखी दादरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मलिक यांनी शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधानांशी झालेल्या भेटीवरून खळबळजनक विधाने केली आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मलिक यांच्या खुलाशावरून मोदींचा शेतकरी विरोधी चेहरा देशासमोर आला आहे, अशी टीका केली. संपूर्ण देश यामुळे आश्चर्यचकित झाला असून पंतप्रधानांच्या अहंकाराचे, शेतकरीविरोधी मानसिकतेचे यापेक्षा दुसरे ज्वलंत उदाहरण नाही. आता स्वतः मोदींनी समोर येऊन सांगावे की त्यांनी मलिकांसमोर अन्नदात्याला अपमानित केले आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी प्राण सोडत असताना मोदी भांडवलदारांसाठीच्या योजना आखत होते, असा टोलाही सुरजेवाला यांनी लगावला.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

शेतकऱ्यांशी संबंधित असंख्य विषय अजूनही प्रलंबित आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे तातडीने मागे घेणे गरजेचे आहे. सरकारने याबाबत किमान प्रामाणिकपणा दाखवावा. किमान हमीभावाला कायदेशीर अधिष्ठान मिळायला हवे.

-सत्यपाल मलिक, राज्यपाल मेघालय

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiFarmer
loading image
go to top