हैदराबाद चकमक प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी?

वृत्तसंस्था
Wednesday, 11 December 2019

- सर्वोच्च न्यायालयाचा प्रस्ताव; चौकशीचे काम दिल्लीतूनच

नवी दिल्ली : हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे चारही नराधम पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार मारले गेल्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या चकमकीची दखल घेत या घटनेची निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या घटनेची तेलंगण उच्च न्यायालयाने दखल घेतल्याची बाब आम्हाला माहिती आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट करताना दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांकरवी या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते, असे नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

या संपूर्ण प्रक्रियेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांच्या नेमणुकीचा प्रस्ताव आम्ही मांडतो, असेही सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. या खंडपीठामध्ये न्या. एस. ए. नझीर आणि न्या. संजीव खन्ना यांचाही समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे माजी न्यायाधीश हे दिल्लीमध्ये बसूनच काम करतील, असेही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशी केली जावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी उद्या (ता. 12) घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

दोन याचिका 

ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि कृष्णकुमार सिंह यांनी तेलंगण सरकारची बाजू मांडली. चकमकीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिलेल्या नियमांचे आम्ही पालन केले असून, हे प्रकरण चौकशीसाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

दरम्यान, या चकमकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका सादर करण्यात आल्या आहेत. यातील एक याचिका ही विधिज्ञ जी. एस. मणी आणि प्रदीपकुमार यादव यांनी सादर केली असून, दुसरी याचिका विधिज्ञ एम.एल. शर्मांकडून सादर करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC to appoint ex judge to probe into Hyderabad Encounter Case