अनिल अंबानी यांना नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

एरिक्‍सन इंडिया कंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि इतरांना देत त्यांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम न दिल्याचा आरोप करत एरिक्‍सन इंडियाने ही याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : एरिक्‍सन इंडिया कंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि इतरांना देत त्यांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम न दिल्याचा आरोप करत एरिक्‍सन इंडियाने ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज सुनावणी झाली असताना न्या. आर. एफ नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अनिल अंबानी आणि इतरांना चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. देय रकमेपैकी 118 कोटी रुपये स्वीकारण्याची विनंती रिलायन्सच्या वतीने कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी या वकिलांनी केली.

फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी मात्र ही रक्कम स्वीकारण्यास नकार देत संपूर्ण 550 कोटी रुपयांची मागणी केली. न्यायालयाने नंतर रिलायन्सला 118 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट रजिस्ट्रीमध्ये भरण्यास सांगितले. एरिक्‍सन इंडियाने अवमान याचिका दाखल करताना थकीत रक्कम न मिळाल्यास अनिल अंबानी आणि इतर दोघांना ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला रिलायन्स कम्युनिकेशनला आदेश देत 15 डिसेंबरपर्यंत सर्व रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा अवमान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Web Title: SC issues notice to Anil Ambani