सामान्यांच्या गरजांकडे विज्ञानाने लक्ष द्यावे

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

विविध विज्ञान शाखांमधील मूलभूत संशोधनाला पाठबळ देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून, काही शाखांमधील संशोधनाचा उपयोग पर्यावरण संरक्षणासाठी आणि अनेक नागरी समस्यांवर मात करण्यासाठी करता येणार आहे, असे मोदी म्हणाले.

तिरुपती - विज्ञानाने सामान्य नागरिकांच्या समस्या आणि गरजांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. 104 व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जगभरात उदयाला येणाऱ्या विनाशकारी तंत्रज्ञानावर नजर ठेवून त्यांचा सामना करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसीत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विज्ञानाच्या सर्व शाखांमधील मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही विज्ञान परिषदेत शास्त्रज्ञांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी दिली. तिरुपती विद्यापीठात झालेल्या आजच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले, ""सायबर-भौतिक यंत्रणेच्या वेगवान वाढीकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्यासारख्या देशासमोर आव्हान निर्माण करण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये आहे. मात्र, याकडे संधी म्हणून पाहत संशोधन, प्रशिक्षण याबरोबरच रोबोटिक्‍स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटायझेशन, माहितीचे विश्‍लेषण, सखोल संशोधन, क्वांटम कम्युनिकेशन आणि इंटरनेटबाबत यामध्ये कौशल्य निर्माण करायला हवे. सेवा आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा वापर करणे विकासाच्या दृष्टीने आवश्‍यक आहे; तसेच शेती, पाणी, ऊर्जा, वाहतूक, आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा, पायाभूत सुविधा, आर्थिक यंत्रणा, भौगोलिक माहिती आणि गुन्हेगारीशी लढा देण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे.'' विनाशकारी तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठीही शास्त्रज्ञांनी सज्ज राहावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

विविध विज्ञान शाखांमधील मूलभूत संशोधनाला पाठबळ देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून, काही शाखांमधील संशोधनाचा उपयोग पर्यावरण संरक्षणासाठी आणि अनेक नागरी समस्यांवर मात करण्यासाठी करता येणार आहे, असे मोदी म्हणाले.

उवाच
- उद्योगासह सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल असे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य
- विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात 2030 पर्यंत भारत पहिल्या तीन देशांमध्ये
- विज्ञान संस्थांनी जगप्रसिद्ध वैज्ञानिकांना बोलवून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे
- विज्ञानाला विकासाचे साधन बनवू

बालाजीचे दर्शन
पंतप्रधान मोदी यांनी आज तिरुपती बालाजीचेही दर्शन घेतले. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा येथे भेट दिली आहे. या वेळी त्यांच्याबरोबर आंध्र प्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंह्मन आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते. मोदी यांचे या वेळी वेदमंत्रांच्या घोषात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Web Title: Science should pay attention to common problems