esakal | Bihar Election : सत्ताधारी एनडीएत जागावाटपाची सुनिश्चिती; 50-50 चा फॉर्म्यूला?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-JDU

सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटपांचं चित्र आता स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

Bihar Election : सत्ताधारी एनडीएत जागावाटपाची सुनिश्चिती; 50-50 चा फॉर्म्यूला?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अवघ्या काहीच दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटपांचं चित्र आता स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात गेली 15 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या जनता दल युनायटेडला याहीवेळेला सत्ता काबीज करुन चौथ्यांदा सत्ताधारी बनायचे आहे. जेडीयू आणि भाजप यांच्यात जागावाटपामध्ये 50-50 चा फॉर्म्यूला ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रालोआतील घटकपक्ष असणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.  

बिहारमध्ये 243 जागांसाठी निवडणुका होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष हा 122 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजप 121 जागांवर निवडणुका लढवणार असल्याचे समजते आहे. जेडीयू आपल्या वाटणीच्या जागांमधील पाच ते सात जागा या जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम पार्टीला लढण्यासाठी देणार आहे. तर त्याचप्रमाणे भाजप आपल्या वाट्यातून रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोकजनशक्ती  पार्टीला काही जागा देणार आहे. मात्र, भाजप आणि लोजपा यांच्यात जागावाटपावरुन अजूनही पुरेसं एकमत झालेलं नाही. त्यामुळे, लोजपा या निवडणुकीत एनडीएत राहून निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढणार याबाबत अजूनही संदिग्धता आहे. 

हेही वाचा - शासनाच्या प्रयत्नांनी बलात्कार थांबणार नाहीत, मुलींवर चांगले संस्कार करा; भाजप आमदाराची मुक्ताफळे

रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान हे गेल्या काही दिवसांपासून अधिकाधिक जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करताहेत. आपल्याला 42 जागा मिळायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर लोजपाला फक्त 15 जागाच देण्याची तयारी भाजपाने दाखवली आहे. जागावाटपाचा हा पेच सुटत नसल्याने आणि अपेक्षित जागा मिळत नसल्याने चिराग पासवान यांनी या निवडणुकीत स्वतंत्रपणे 143 जागा लढवणार असल्याचा इशारा दिला होता. एकूणच, हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. 

हेही वाचा - बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी

पाटण्यात जेडीयू आणि भाजप यांच्यात जागवाटपावरुन सुमारे चार तास चर्चा झाली. या बैठकीत जेडीयूचे लल्लन सिंह, आरसीपी सिंह, विजय चौधरी आणि विजेंदर यादव हे महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. 

महाआघाडीत सुद्धा जागावाटपावरुन खलबते सुरु होती. मात्र आता विरोधकांच्या आघाडीत जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीत राजद 144 जागा तर काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 2015 मध्ये काँग्रेसने आरजेडी आणि जेडीयूसोबत महाआघाडी केली होती. मात्र आता जेडीयू महाआघाडीत नसल्याने पूर्वीपेक्षा काँग्रेसला यावेळी जास्त जागा मिळाल्या आहेत. या आघाडीकडून राजदचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला म्हणजेच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.