दिल्लीकरांसाठी खूशखबर! लवकरच चालू होणार दिल्ली-कटरा रेल्वे

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

- दिल्ली-कटरा मार्गावर लवकरच "वंदे भारत' 
- पुढील महिन्यात सेवा सुरू होणे शक्‍य 

 

नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि त्यामुळे या मार्गाची निवड करण्यात आल्याचे कळते. 

सध्या या मार्गावरील गाड्यांना प्रवासासाठी बारा तास लागतात. पण, "वंदे भारत'मुळे हा प्रवास आठ तासांत होईल. दिल्ली-वाराणसी मार्गावर 15 फेब्रुवारीपासून अशी पहिली गाडी धावायला लागली आहे. दिल्ली-कटरा मार्गावर सध्या सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीनदा "वंदे भारत' धावण्याचे नियोजन आहे. पण, नंतर ही गाडी आठवड्यातून पाच वेळा सोडण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ही गाडी दिल्लीहून सकाळी सहा वाजता निघून दुपारी दोन वाजता कटराला पोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी कटराहून दुपारी तीन वाजता निघून रात्री 11 वाजता दिल्लीत पोचेल. या प्रवासात येता-जाता गाडीला अंबाला, लुधियाना आणि जम्मू तावी या स्थानकांवर प्रत्येकी दोन मिनिटांचे थांबे असतील. दिल्ली-कटरा मार्गावर या गाडीच्या चाचण्या झाल्या आहेत. दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-चंडीगड या मार्गांवरही लवकरच "वंदे भारत'ची सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे. 

12 तास -दिल्ली-कटरा प्रवासाचा सध्याचा वेळ 

08 तास -"वंदे भारत'च्या प्रवासाचा वेळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Vande Bharat Express likely from August