esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील ४० ते ४५ टक्के बळी भारतात

बोलून बातमी शोधा

Coronavirus
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील ४० ते ४५ टक्के बळी भारतात
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या जागतिक साथीतील दुसऱ्या लाटेमुळे देश असाहाय्यतेकडे गेला आहे. जगात रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल ४० ते ४५ टक्के बळी भारतात जात आहेत. नवीन रुग्णसंख्येबाबतही भारत जगात आघाडीवर आहे.

प्रचंड वेगाने आलेल्या या कोरोनारुपी सुनामीमुळे केंद्र आणि राज्यांच्या साऱ्या यंत्रणा कोलमडली आहे. औषधे आणि लसीकरणातही असाहाय्य स्थिती झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोरोना योद्धे, राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करून ही लाट रोखण्याचे उपाय करीत आहेत. मोदी यांनी मागील १० दिवसांत किमान २१ आढावा बैठका घेतल्या आहेत. तरीही स्थितीत सुधारणा दिसत नाही.

मागील २४ तासांत जगातील ८.९२ लाखपैकी जवळपास म्हणजे म्हणजे ३.८६ लाख नवे रुग्ण भारतामध्ये आढळले. १५,१४२ बळींत भारतातील सर्वाधिक ३,५०१ लोकांचा समावेश आहे. अर्थात ही आकडेवारी केवळ सरकारी आहे. देशातील बहुतेक स्मशाने आणि दफनभूमीतील चित्र वेगळेच असल्याचे सार्वत्रिक मत आहे.

हेही वाचा: अमेरिकेची पहिली खेप भारतात दाखल; काय केलीय मदत?

देशातील मृत्यूदर व नव्याने संसर्गाचा म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेटही सातत्याने वाढत आहे. मागच्या आठवड्यात दर शंभर लोकांमागे १७ ते १८ लोक बाधित होते. तो आकडा या आठवड्यात २१ ते २५ वर गेला आहे.

दिलासादायक चित्र

नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा विक्रम एकीकडे होत असताना कोरोनाला हरवणाऱ्या लढवय्या भारतीयांची संख्याही रोज वाढत आहे आणि हे दिलासादायक चित्र म्हणावे लागेल. मागील २४ तासांत देशात ३ लाख ८६ हजार ८५४ नवे रुग्ण आढळले. त्याच वेळी २ लाख ९१ हजार ४८४ जणांनी कोरोनावर मात केली. बरे होणाऱ्यांचा आतापर्यंतचा हा विक्रमी आकडा आहे.