
संसर्गाची दुसरी लाट तुमच्यामुळेच आली; मद्रास उच्च न्यायालय भडकले
चेन्नई - आज अवघा देश कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या तीव्र लाटेला सामोरे जात असून त्यासाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे. तुमच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे खडे बोल आज मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाला सुनावले.
देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असतानाही तुम्ही पाच राज्यांमधील निवडणूक प्रचाराला परवानगी दिली. आता दोन मे रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कोरोनाविषक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जायला हवे. त्या नियमांची ब्लूप्रिंट आम्हाला सादर करा अन्यथा आम्ही मतमोजणी थांबवू असा निर्वाणीचा इशारा देखील न्यायालयाने दिला.
दरम्यान निवडणूक आयोगाने मात्र प्रत्यक्ष आदेश वाचल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ असे म्हटले आहे. देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्यासाठी केवळ तुमचीच संस्था जबाबदार आहे. तुमच्या अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करायला हवेत. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. प्रचाराच्या काळामध्ये मास्क, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले, असे उच्च न्यायालयाने सांगितले. विविध राज्यांमध्ये लाखोंच्या प्रचारसभा होत असताना तुम्ही काय दुसऱ्या ग्रहावर होता काय? असा सवाल मुख्य न्या. संजीव बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
हेही वाचा: "लसींच्या किंमती कमी करा"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन
ब्लूप्रिंट सादर करा
आता दोन मे रोजी मतमोजणी आहे त्यासाठी तुम्ही नेमके काय नियम तयार केले ते सांगा. या नियमांची एक ब्लूप्रिंट शुक्रवारपर्यंत आमच्यासमोर सादर करा. हे केले नाहीतर आम्ही मतमोजणी होऊ देणार नाही, असा संताप देखील न्यायालयाने व्यक्त केला. तमिळनाडूचे परिवहनमंत्री एम.आर. विजयभास्कर यांनी करूर मतदारसंघामध्ये मतमोजणी होत असलेल्या हॉलमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जावे अशी मागणी करणारी याचिका न्यायालयामध्ये दाखल केली होती. विशेष म्हणजे विजयभास्कर याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
न्यायालय म्हणाले
मतमोजणीच्या दिवशी संसर्ग पसरता कामा नये
मतमोजणीदरम्यान कोरोना नियम पाळले जावेत
मतमोजणी टाळता येणे शक्य आहे का ते पाहा
लोकांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे हे लक्षात ठेवा
जिवंत असतील तरच लोक अधिकार वापरतील
आजमितीस लोकांना जिवंत ठेवणे हेच महत्त्वाचे
मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशांचे मी स्वागत करते. कोरोना काळामध्ये निवडणूक आयोग त्याची जबाबदारी झटकू शकत नाही असे स्पष्टपणे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोग सध्या भाजपचा पोपट आणि मैना बनला आहे. केंद्रामुळेच कोरोना वाढला आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल
Web Title: Second Wave Of Infection Came Because Of You Election Commission Madras High
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..