साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या "भाषा सन्मान' पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.

नवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या "भाषा सन्मान' पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.

अभिजात वाङ्‌मय आणि संशोधनपर लिखाणासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या भाषा सन्मान पुरस्कारासाठी (2018) पुण्याच्या डॉ. शैलजा बापट यांची निवड करण्यात आली आहे. "ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज' हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची "प्रोफेसर एमिरेट्‌स' म्हणून निवड करण्यात आली होती. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या त्या सदस्य आहेत. एक लाख रुपये, ताम्रपट आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्य अकादमीतर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली. देशातील सर्व भाषांमधील उत्कृष्ट वाङ्‌मयीन कलाकृतींची यामध्ये निवड केली जाते. यामध्ये मराठी भाषेसाठी मा. सु. पाटील लिखित "सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (वाङ्‌मयीन समीक्षा)' ग्रंथाची निवड करण्यात आली आहे, तर कोकणी भाषेतील कवी परेश नरेंद्र कामत लिखित "चित्रलिपी' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपयांचा चेक, ताम्रपट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 29 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत अकादमीतर्फे आयोजित होणाऱ्या वार्षिक "शब्द महोत्सवा'त हे पुरस्कार प्रदान केले जातील. 24 भाषांमधील विविध कलाकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा संग्रह, तीन समीक्षा ग्रंथ व दोन निबंधांचा समावेश आहे.

Web Title: senior critic m s patil wins sahitya akademi award