esakal | 50 खून केल्यानंतर मोजायचं बंद केलं; डॉक्टरचा खळबळजनक कबुलीजबाब
sakal

बोलून बातमी शोधा

devendra sharma

कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. यातच आता वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे.

50 खून केल्यानंतर मोजायचं बंद केलं; डॉक्टरचा खळबळजनक कबुलीजबाब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. यातच आता वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ इथल्या देवेंद्र शर्मा या डॉक्टरने पोलिसांसमोर असं मान्य केलं आहे की, त्याने 50 जणांचा खून केल्यानंतर मोजायचं बंद केलं. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला पॅरोलचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर अटक केली आहे.

देवेंद्रने दिल्लीसह आसपासच्या राज्यात ट्रक आणि टॅक्सी ड्रायव्हर्स मिळून 50 हून जास्त जणांची हत्या केली आहे. देवेंद्र आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याला बपरोला भागातून अटक केली आहे. तो पॅरोलवर असताना पळून गेला होता. पोलिसांनी दावा केला आहे की, त्याने 100 हून अधिक हत्या केल्याची शक्यता असून नेमकी संख्या सांगता येत नाही. कारण त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांतील पोलिस तपास करत आहेत. 

हे वाचा - भारतातील नागरिकांचे सरासरी आयुष्य 5.2 वर्षांनी वाढणार

पोलिसांनी सांगितलं देवेंद्र शर्माला अपहरण आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात बनावट गॅस एजन्सी चालवल्या प्रकरणी दोन वेळा अटक केली होती. तसंच किडनी विकण्याचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अनेक राज्यांमध्ये त्याला शिक्षाही झाली आहे. डीसीपी राकेश पवेरिया यांनी सांगितलं की, याआधी तो मोहन गार्डनमध्ये राहत होता. तिथून बपरोला इथं गेला. याठिकाणी त्याने एका विधवा महिलेशी लग्न केलं आणि प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरु केला. याची माहिती पोलिसांना मिळताच मंगळवारी त्याला ताब्यात घेतलं. 

बिहारमध्ये सिवान इथून बीएएमएसची डीग्री घेतल्यानंतर तो जयपूरमध्ये क्लिनिक चालवत होता. त्यानंतर 1992 मध्ये गॅस डिलरशिप स्कीममध्ये 11 लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यात नुकसान झालं. पुढे 1995 मध्ये त्याने अलिगढमधील छारा गावात बनावट गॅस एजन्सी सुरु केली आणि त्यानंतर त्याचा वावर गुन्हेगारी क्षेत्रात वाढला.

हे वाचा - देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15.83 लाखांवर

डीसीपींनी सांगितले की, देवेंद्रचे सहकारी एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक लुटायचे आणि ड्रायव्हरची हत्या करायचे. त्यानंतर ट्रकमधून सिलिंडर त्यांच्या बनावट गॅस एजन्सीमध्ये उतरवून घ्यायचे. 1994 मध्ये देवेंद्रला किडनी तस्करीच्या रॅकेटमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर 2004 मध्येही गुडगाव इथं किडनी रॅकेटमध्ये त्याच्यासह अनेकांना ताब्यात घेतलं होतं.