देश संकटात, तुमची मदत हवी: राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जानेवारी 2018

तुम्ही सर्वजण देशासाठी खूप महत्त्वाचे आहात. रोजगार निर्मितीच्या बाबतीत देश सध्या आठ वर्षे मागे आहेत. जागतिक स्तरावरील शिक्षण उपलब्ध करून देणे आणि गरिबी नष्ट करण्याऐवजी सध्या देशात विभाजनाचे काम करण्यात येत आहे. देशात शांतता निर्माण करण्यासाठी आणि अहिंसा रोखण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

नवी दिल्ली : तुम्ही देशासाठी महत्त्वपूर्ण आहात. देशात सध्या रोजगार आणि विभाजनाच्या संकटे असून, देश सध्या संकटात आहे. तुम्ही देशाची मदत करू शकता, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधी सतत चर्चेत आहेत. खादीचा कुडता व पायजमा ही वेशभूषा ही त्यांची ओळख बनली असली तरी, राहुल गांधी अन्य पेहरावात दिसले की माध्यमांमध्ये त्याची दखल घेतली जाते. आखाती देशांमधील बहारिनच्या दौऱ्यावर राहुल गांधी सोमवारी सुटा-बुटात दिसले. विमानतळावर या वेशातील राहुल यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. 'ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिन' (जीओपीआयओ) या संघटनेच्या निमंत्रणावरून राहुल गांधी यांनी अनिवासी भारतीयांच्या परिषदेला बहारिनमध्ये संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. 

या दौऱ्यात राहुल गांधींनी बहारिनमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. "सॉफ्ट पॉवरचे "एनआयआर' आपले खरेखुरे प्रतिनिधी असून, जगातील आपल्या देशाचे ते ब्रॅंड ऍम्बेसिडर आहेत,' असे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत राहुल गांधी म्हणाले, की तुम्ही सर्वजण देशासाठी खूप महत्त्वाचे आहात. रोजगार निर्मितीच्या बाबतीत देश सध्या आठ वर्षे मागे आहेत. जागतिक स्तरावरील शिक्षण उपलब्ध करून देणे आणि गरिबी नष्ट करण्याऐवजी सध्या देशात विभाजनाचे काम करण्यात येत आहे. देशात शांतता निर्माण करण्यासाठी आणि अहिंसा रोखण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अल वादी राजवाड्यात युवराज शेख खालिद बिन हमाद अल खलिफा यांचीही भेट घेतली, असे कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. या दोघांमध्ये खेळांविषयी चर्चा झाली. खेळ आणि क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी एकत्रित काम करण्याबाबतही ते बोलले. अनिवासी भारतीयांमध्ये कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होणार असल्याचेही पक्षाने सांगितले. 

'राहुलकडून मोदींची नक्कल' 
राहुल गांधी यांच्या एक दिवसाच्या बहारिन दौऱ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले असले तरी, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नरसिंह राव यांनी त्यावर टीका केली आहे. आज केलेल्या ट्‌विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करीत आहेत. आधी ते महाविद्यालयात गेले. नंतर मंदिरांना भेटी दिल्या. आता ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधत आहेत.'' 

Web Title: Serious problem at home you are part of the solution says Rahul Gandhi NRIs in Bahrain