गर्भवती विद्यार्थीनीचा कॉलेजने केला छळ; जबरदस्ती करायला लावला डान्स 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

शिक्षकांनी एका कार्यक्रमादरम्यान जबरदस्तीने गर्भवती विद्यार्थीला डान्स करायला लावला. वारंवार विनंती करुनही शिक्षकांनी तिचे काही एक ऐकून घेतले नाही.

छत्तीसगड - येथील संत हरकेवल बीएड महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयातील गर्भवती विद्यार्थीनीला तिच्या मनाविरुध्द डान्स करायला लावला आहे. प्रतिभा मिंज नामक ही विद्यार्थीनी 24 वर्षाची असून तिच्या सोबत हा प्रकार ती सात महिन्यांची गर्भवती होती. 

महाविद्यालयाने येथील विद्यार्थीनींसाठी एक अजब नियम बनवला आहे. या नियमानुसार बीएड करत असताना दोन वर्षाच्या काळात विद्यार्थीनी गर्भवती राहु शकत नाही. प्रतिभा कडून ऑगस्ट 2017 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेताना तसे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेतले गेले होते. 'डिसेंबर महिन्यात शिक्षकांनी एका कार्यक्रमादरम्यान जबरदस्तीने आपल्याला डान्स करायला लावला. वारंवार विनंती करुनही शिक्षकांनी आपले काही एक ऐकून घेतले नाही. तसेच कॉलेजच्या नियमाचे उल्लंघन केले असे सांगत आपल्याला परिक्षेत बसू दिले जाणार नाही असी धमकीही दिली गेली.' असा आरोप प्रतिभाने मुख्याध्यापकांवर केला आहे. 

परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी 80 टक्के लागते. पण प्रतिभाची हजेरी 94 टक्के आहे. 'प्रसुती आधी न चुकता रोज वर्गात हजेरी लावली आणि प्रसुती झाल्यानंतर मी सुट्ट्या घेतल्या', असेही प्रतिभाने सांगितले. 'माझ्या पालकांनी कॉलेजमध्ये सुट्टीचा अर्ज देण्यास सांगितला होता. मी अर्ज केला असता मुख्याध्यापक अंजन सिंह यांनी मला हजर होण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर 17 आणि 20 मार्चला मी कॉलेजमध्ये सुट्टीसाठी मुख्याध्यापकांकडे विनंती केली. त्यावर त्यांनी मला सर्व क्लासेसला हजेरी लाव अन्यथा परिक्षेला बसू दिले जाणार नाही, असे खडसावले.' अशी माहिती प्रतिभाने दिली. जिल्हाधिकारी किरण कौशल यांच्याकडे हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. एस. के. त्रिपाठी यांना बोलावून घेत प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच विद्यार्थीनीला परिक्षेपासून अजिबात वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे.    

 

Web Title: Seven month pregnant student force to dance by college teachers