Budget 2019 : निर्मला सीतारामन यांच्याविषयी 'या' सात गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

कोण आहेत निर्मला सीतारामन? जाणून घ्या त्यांच्याविषयीची प्रकाशात नसलेली वैशिष्ट्येः

अर्थसंकल्प 2019
नवी दिल्ली : भारतात तब्बल 48 वर्षानंतर केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी महिला उभी राहिली. या आधी 1970 मध्ये तत्कालिन अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केंद्रीय बजेट मांडले होते. त्यानंतर अर्थमंत्रालयावर पुरूषांची मक्तेदारी होती. मागच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला, तेव्हा भारतीय जनतेमध्ये पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्याविषयीची उत्सुकता वाढली. 

कोण आहेत निर्मला सीतारामन? जाणून घ्या त्यांच्याविषयीची प्रकाशात नसलेली वैशिष्ट्येः

1. संसदेच्या सदस्यही नसलेल्या निर्मला सीतारामन यांना मागच्या सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनी व्यवहार आणि वाणिज्यमंत्री करून सर्वांना धक्का दिला. त्यानंतर त्यांना संरक्षणमंत्रीपदही दिले. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर राज्यात परतल्यानंतर संरक्षण खात्याची जबाबदारी  सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. 

2. मोदींनी एनडीएच्या दुसऱया कार्यकाळात निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपद देऊन सगळ्यांना धक्का दिला. वर्ष 1970 ते 1971 दरम्यान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून काम बघितले होते. त्यानंतर जवळपास 48 वर्षानंतर महिलेकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले.

3. सीतारामन आधीपासून भाजपसमर्थक असल्या तरी ते 2008मध्ये त्यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केला. 2016मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या. ज्येष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनाने पक्षप्रवक्तेपद सांभाळणारा एक दाक्षिणात्य चेहरा म्हणून सीतारामन यांची ओळख निर्माण झाली. 

4. मूळच्या मदुराईच्या असणाऱ्या सीतारामन यांनी भारत व युरोप यांच्यातील व्यापारसंबंधांवर जेएनयु विद्यापीठातून त्यांनी एमए इकॉनॉमिक्सची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी एमफिल केलं. 

5. सीतारमन यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांचे बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. 

6. राजकारणात येण्यापूर्वी सीतारामन या सेल्सगर्लचे काम करत होत्या. त्यांचे लग्न डॉक्टर पराकाला प्रभाकर यांच्याशी झाले. या दोघांची जेएनयुमध्ये ओळख झाली होती. डॉक्टर प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर निर्मला सीतारामन लंडनमध्ये राहू लागल्या. लंडनमध्ये असताना निर्मला सीतारामन या एका दुकानामध्ये सेल्सगर्लचं काम करत होत्या, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिले होते. त्यानंतर त्यांनी PricewaterhouseCoopersमध्ये सीनिअर मॅनेजरचीही नोकरी केली.

7. सीतारामन 2003 ते 2005 या काळात नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या सदस्या राहिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven things about Finance Minister Nirmala Sitharaman