Bihar Election : भाजप स्टार प्रचारकांच्या यादीमधून शाहनवाज हुसेन,राजीव प्रताप रूडी यांची नावे वगळल्याने चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

खासदार रूडी यांनी,मला पक्षाने आमदाराच्या पात्रतेचाही समजले नाही,अशी खंत व्यक्त केल्यावर हा मुद्दा चव्हाट्यावर आला.स्वतःला पक्षाचे नवरत्न म्हणणारे शाहनवाज यांना पक्षनेतृत्वाने यातून आणखी एक "मेसेज' दिला आहे.

नवी दिल्ली - बिहार निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या "स्टार' प्रचारकांच्या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

खासदार रूडी यांनी, मला पक्षाने आमदाराच्या पात्रतेचाही समजले नाही, अशी खंत आज व्यक्त केल्यावर हा मुद्दा चव्हाट्यावर आला. स्वतःला पक्षाचे नवरत्न म्हणणारे शाहनवाज यांना पक्षनेतृत्वाने यातून आणखी एक "मेसेज' दिला आहे. बिहारच्या कोणत्याही निवडणूकीत भाजप प्रचारकांच्या यादीतून या दोघांची नावे कटाप होण्याची गेल्या तीन-साडेतीन दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाजपेयी-अडवानी युगापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. शाहनवाज यांना 2014 पूर्वी भाजपचा मुस्लिम चेहरा म्हटले जायचे. सिकंदर बख्त, मुख्तार अब्बास नक्वी व शाहनवाज असे निवडक मुस्लिम नेतेच भाजपमध्ये दीर्घकाळ टिकले. मात्र सैय्यद जफर इस्लाम यांच्यासारखे नवे चेहरे आल्यावर आता शाहनवाज यांची पूर्वीइतकी गरज पक्षाला वाटेनाशी झाल्याचे सांगितले जाते. यावेळी शाहनवाज यांना भागलपूरमधून विधानसभेच्या तिकिटाबाबत विचारण्यात आले होते. त्या प्रस्तावाबाबत त्यांनी उदासीनता दाखविल्यावर सर्वेसर्वा नेतृत्वाने त्यांना आणखी "साईडलाईन' केल्याचे सांगितले जाते. शाहनवाज यांनी आपल्याला पक्षाचा हा निर्णय मान्य आहे, अशी त्रोटक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आपण अटलजींच्या नवरत्नांपैकी एक आहोत, अशी आठवणही त्यानी करून दिली आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, या दोघांचीही नावे स्टार प्रचारकांत नसण्याने इतकी चर्चा होऊ नये. बिहार भाजपकडून ज्या नेत्यांच्या नावांचे प्रस्ताव आले होते त्यांचाच यादीत समावेश आहे. हे खरे असेल तर सलग वाहिन्यांवर भाजपचा किल्ला लढवणारे शाहनवाज व छपरातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलेले रूडी यांची गरज मुळात राज्य भाजप नेत्यांनाच वाटत नाही काय, असा जाणकारांचा सवाल आहे. 

1996 पासून व वयाच्या 25 व्या वर्षापासून भाजपकडून अनेक निवडणूका जिंकणारे रूडी सध्या दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचीही संधी नाकारण्यात आली. शाहनवाज यांच्यापेक्षा बिहारच्या मुस्लिम मतदारांसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचाच करिष्मा पुरेसा असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र अनेक आमदार, तसेच खासदार सुशील सिंह, आर. के. सिंह, विवेक ठाकूर, सारी हयात लालूप्रसादांच्या पक्षात घालवून भाजपमध्ये आलेले मंत्री रामकृपाल सिंह यांच्यासारखे अनेक नवे चेहरे "स्टार प्रचारक' मानणाऱ्या भाजपने स्वतःच्याच राष्ट्रीय प्रवक्‍त्यांवर हा अविश्‍वास दाखविल्याने चर्चा सुरू आहे. राज्यातील फीडबॅकच्या आधारावर भाजपने ज्या स्टार प्रचारकांच्या सभा बिहारमध्ये लावण्याचे ठरविले आहे त्यात असलेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह व उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राजपूत-ठाकूरबहुल भागातून मागणी असल्याचे सांगितले जाते. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव नसणे माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पक्षाने मला आमदाराच्याही पात्रतेचे समजले नाही. 
- राजीव प्रताप रूडी, भाजप खासदार व माजी केंद्रीय मंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahnawaz Hussain and Rajiv Pratap Rudy were dropped from the list of BJP star campaigners