कशासाठी मागायची माफी? शशी थरुरांचा 'पुलवामा'वरुन भाजपला संतप्त सवाल

shashi tharoor
shashi tharoor

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ काल प्रसारित झाला होता. यामध्ये पाकिस्तानचे खासदार आपल्या संसदेत याबाबत कबुली देताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर भाजप आपल्या विरोधकांवर आक्रमक झाली असून पुलवामा हल्ल्यावेळी विरोधकांनी भाजपवर केलेल्या आरोपांबाबत आता पलटवार केला जात आहे. आज शनिवारी नरेंद्र मोदी यांनीदेखील गुजरातमधील आपल्या एका कार्यक्रमात पुलवामा घटनेचा हवाला देत या व्हिडीओवरुन काँग्रेसला निशाणा बनवलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल यासंदर्भात काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी, असं ट्विट केलं होतं. यावर आता काँग्रेस नेते शशी थरुर यांनी उत्तर दिलं आहे. 

प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं होतं की, पुलवामा हल्ल्याबाबत कटाच्या कहाण्या रचण्याबद्दल आणि हल्ल्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी. मात्र आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी यावरुन आता भाजपालाच प्रतिप्रश्न केला आहे. 

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी शनिवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मला हे समजत नाहीये की नक्की कोणत्या गोष्टीसाठी काँग्रेसने माफी मागायला हवी. जवानांच्या सुरक्षिततेबद्दल सरकारकडून अपेक्षा केल्याबद्दल माफी मागायला हवी? की या राष्ट्रीय शोकांतिकेचे राजकारण करण्याऐवजी चिंता व्यक्त करण्याबद्दल माफी मागायची की आपल्या शहीदांच्या कुंटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी माफी मागायची?

पुलवामाच्या या हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते. भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आली कुठून आणि ती फक्त सैनिकांसाठी असलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या सिव्हील गाडीतून कशी आणली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते, तसेच सरकारला अनेक प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आले होते. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, पाकिस्तानने पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात आपला हात असल्याची कबुली दिलीय. आता काँग्रेस आणि अन्य लोकांनी, ज्यांनी कटाच्या कहान्या रचल्या होत्या त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी आता देशाची माफी मागायला हवी. 

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी गुरुवारी आपल्या संसदेत म्हटलं होतं की, आम्ही भारतात घुसून मारलं होतं. मात्र यानंतरच्या वक्तव्यात चौधरी यांनी म्हटलं की त्यांच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं आहे.  पाकिस्तान कधीच दहशतवादाला खतपाणी घालत नाही. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com