कामकाजापासून दूर राहण्याचा गायकवाडना शिवसेनेचा सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 एप्रिल 2017

शिवसेनेने विमान कंपन्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांकडे सादर केला आहे; परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात प्रसार माध्यमांमध्ये एकतर्फी बाजू येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादग्रस्त ठरलेले खासदार रवींद्र गायकवाड यांना हे प्रकरण शांत होईपर्यंत संसदेच्या कामकाजापासून दूर राहण्यास शिवसेनेने सांगितल्याचे कळते.

विमान कंपन्यांच्या प्रवासबंदीचा फटका बसल्यामुळे गायकवाड यांनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांना आणि विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून आपली बाजू मांडल्याचेही समजते.

मारहाण प्रकरणानंतर गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह पाच विमान कंपन्यांनी हवाई प्रवासबंदी लागू केल्याने दिल्लीहून मतदारसंघात जाण्यासाठी गायकवाड यांना रेल्वेचा पर्याय निवडावा लागला होता. परतीच्या प्रवासासाठी विमानाचे तिकीट काढण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे ते मोटारीने दिल्लीला येणार, अशी चर्चा रंगली होती; परंतु शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षानेच त्यांना तूर्तास दिल्लीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

या मुद्द्यावर शिवसेनेने विमान कंपन्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांकडे सादर केला आहे; परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात प्रसार माध्यमांमध्ये एकतर्फी बाजू येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे गायकवाड यांना त्यांची बाजू लोकसभाध्यक्षांकडे; तसेच सरकारकडे मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपल्याला झालेला त्रास, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्वर्तन याचा उल्लेख असलेले पत्र सुमित्रा महाजन यांना आणि त्याचप्रमाणे अशोक गजपती राजू यांना पाठविल्याचे कळते. यात सर्व विमान कंपन्यांनी लादलेल्या बंदीमुळे "संचार स्वातंत्र्या'वर गदा येत असल्याचेही गायकवाड यांनी म्हटल्याचे समजते.

Web Title: shiv sena advices ravindra gaikwad to keep aloof