esakal | आम्ही प्रियांका गांधींच्या पाठीशी; शिवसेनेचे भाजपवर कोरडे आसूड
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही प्रियांका गांधींच्या पाठीशी; शिवसेनेचे भाजपवर कोरडे आसूड

आम्ही प्रियांका गांधींच्या पाठीशी; शिवसेनेचे भाजपवर कोरडे आसूड

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसेत शेतकऱ्यांना चिरडून ठार करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तीसहून अधिक तास नजरकैदेत असणाऱ्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी काल अधिकृतरित्या अटक केली. यावरून आता शिवसेनेने कॉंग्रेसची पाठराखण करताना विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल कॉंग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेने लखीमपूर खेरी येथे शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी केली असल्याचे समजत आहे. आज शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून या घटनेवरुन जळजळीत असा अग्रलेख लिहला आहे.

हेही वाचा: 'रामायणा'त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने अग्रलेखातून मोदी सरकार आणि यूपी सरकारवर कोरडे आसूड ओढले आहेत. 'स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’! प्रियंकाची लढाई!!' या मथळ्याखाली असलेल्या या अग्रलेखात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या असून हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात? असा सवाल शिवसेनेने केला आहे. ज्या जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना हातात झाडू घेऊन कचरा काढावा लागल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे तसेच देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते, असा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

हेही वाचा: Vehicle Scrapping Policy: जाहिर नियमावलीत असे आहेत नियम

शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या चिरडून टाकण्याचे हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती, असा खोचक टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.

प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा देखील शिवसेनेने या अग्रलेखातून सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात? असा सवालही शिवसेनेने केला आहे.

loading image
go to top