शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडायला भाग पाडलं - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ सुरू आहे. यातच कृषी विधेयकाच्या विरोधात अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. 

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ सुरू आहे. यातच कृषी विधेयकाच्या विरोधात अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. आता एनडीएचे भाजपसोबत जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत. तसंच आम्ही बाहेर पडलो म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असाही गौप्यस्फोट संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. 

संजय राऊत म्हणाले की, आम्ही अजुनही जुने संबंद विसरू शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्वाचा स्तंभ होतो. एनडीएमध्ये कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला पाहिजे होती. सर्वपक्षीय तर दूरच पण एनडीएत कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय घेतले जात असतील तर धोरणात्मक चर्चा होणं आवश्यक होतं.

हे वाचा - बर्थडे गिफ्ट काय हवं? पंतप्रधान मोदींनी सांगितली Wish List

कृषी विधेयकाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, या विधेयकामुळे शेतकऱ्यांना नुकसान होईल आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांसह शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. 

दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणावरूनही त्यांना विचारण्यात आले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण असल्यानं मला टार्गेट केलं जातं असं म्हटलं होतं. यावर राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जात या विषयाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेबांनी दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader sanjay raut reaction on harsimrat kaur badal resign