अविश्‍वास ठरावामध्ये शिवसेनेचा भाजपला विरोध कायम; मतदानावर बहिष्कार! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अद्याप कायम असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तेलगू देसम पक्षाने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वासदर्शक ठरावावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. यामुळे भाजपविरोधातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. 

लोकसभेमध्ये आजपासून विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली. त्या पार्श्‍वभूमीवर भाजप, कॉंग्रेससह बहुतांश पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे. शिवसेनेही व्हिप जारी केल्याचे वृत्त काल (गुरुवार) प्रसिद्ध झाले होते. मात्र, यावरून शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला. पक्षप्रतोद चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना अविश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानामध्ये सहभागी होऊ नका, असे आदेश दिले. मतदानावर शिवसेनेचा बहिष्कार असला, तरीही अविश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेमध्ये मात्र खासदार अरविंद सावंत पक्षाची भूमिका मांडतील, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने 'संख्याबळ नव्हे, तर ठरावामागील कारणे महत्त्वाची आहेत', असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. 

Web Title: Shiv Sena MPs will abstain from voting during No Confidence Motion