समझोत्यासाठी काका पुतण्याच्या घरी

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली जावी म्हणून अखिलेश विशेष आग्रही आहेत. मुलायमसिंह गुरुवारी रात्री लखनौमधून परतल्यानंतर अखिलेश त्यांची भेट घेऊन चर्चा करणार होते; पण या वेळी मुलायम यांच्यासोबत अमरसिंहदेखील असल्याचे समजताच अखिलेश यांनी भेटीचा बेत रद्द केला. यानंतर अभयराम आणि राजपाल यादव यांनी मुलायम यांची भेट घेऊन आपापसांतील मतभेद मिटविण्याची विनंती केली.

लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवी संपुष्टात आणण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुलायम गोटाचे प्रदेशाध्यक्ष शिवपालसिंह यादव मैदानात उतरले असून त्यांनी आज अखिलेश यांची भेट घेऊन चर्चा केल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीचा तपशील मात्र अद्याप उघड झालेला नाही. या बैठकीनंतर शिवपाल यांनी पुन्हा मुलायमसिंह यांची भेट घेतली. मुलायम आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करणार होते; पण आझमखान यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केल्याचे समजते.
दरम्यान, या पक्षांतर्गत वादाचे खापर स्वत:वर फुटल्यानंतर ज्येष्ठ नेते अमरसिंह यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली जावी म्हणून अखिलेश विशेष आग्रही आहेत. मुलायमसिंह गुरुवारी रात्री लखनौमधून परतल्यानंतर अखिलेश त्यांची भेट घेऊन चर्चा करणार होते; पण या वेळी मुलायम यांच्यासोबत अमरसिंहदेखील असल्याचे समजताच अखिलेश यांनी भेटीचा बेत रद्द केला. यानंतर अभयराम आणि राजपाल यादव यांनी मुलायम यांची भेट घेऊन आपापसांतील मतभेद मिटविण्याची विनंती केली. आज अखिलेश-शिवपाल यांच्या भेटीनंतर पक्षांतर्गत सामोपचाराची शक्‍यता बळावली आहे.

आमदारांचे पाठबळ
अखिलेश यादव यांच्या पाठीशी 212 आमदार 24 खासदारांचे बळ असून, पक्षाच्या 5 हजार प्रतिनिधींनी देखील त्यांना पाठिंबा दर्शविला असल्याचे रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश यांचा पक्षच खरा समाजवादी पक्ष आहे, हे आता आमच्या पाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावरूनच दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

खाती गोठविण्याची विनंती
अखिलेश यांनी आज पुन्हा मुलायमसिंह यांना चेकमेट देत बॅंकांना समाजवादी पक्षाची खाती गोठविण्याची विनंती केली आहे, पक्षाच्या विविध खात्यांवर पाचशे कोटी रुपये जमा असल्याचे बोलले जाते. शिवपाल यादव यांच्या नावे ही सर्व खाती ऑपरेट होत होती. पक्षाची खाती गोठविली गेल्यास मुलायम यांच्या पाठीशी असणारे अर्थबळदेखील कमी होणार आहे.

अखिलेश यांना शुभेच्छा
अखिलेश यांनी माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत, ते माझ्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झाले, असा दावा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांनी केला आहे. कधीकाळी काका शिवपाल यांनी अखिलेश यांना सांभाळले होते. आज त्यांनाच विरोध केला जात आहे. अखिलेश यांच्या जडणघडणीमध्ये माझा असलेला वाटा सर्वांना ठाऊक असल्याचेही अमरसिंह यांनी नमूद केले.

"बसप'ची दुसरी यादी जाहीर
विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने आज शंभर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये मुस्लिम समाजातील 58 नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. "बसप'ने आतापर्यंत दोनशे उमेदवार जाहीर केले आहेत. अन्य पक्षांतील राजकीय संघर्ष लक्षात घेऊन मायावती यांनी 403 उमेदवारांची नावे याआधीच निश्‍चित केली असून ती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जातील.

अमरसिंह हे जर लखनौमध्ये आले नसते तर पक्षातील वाद मिटला असता.
- नरेश अग्रवाल, स. प. नेते

Web Title: shivpal finally meets akhilesh