esakal | Bihar Election : बिस्कीट चिन्ह मागे; आता शिवसेना वाजवणार 'तुतारी'
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Symbol in bihar

अखेर शिवसेनेच्या या मागणीचा विचार करत निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं चिन्ह दिलं आहे.

Bihar Election : बिस्कीट चिन्ह मागे; आता शिवसेना वाजवणार 'तुतारी'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक राष्ट्रीय पक्ष तसेच बिहारमधील प्रादेशिक पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. या  पक्षांबरोबरच महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षदेखील बिहारच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत. हे दोन पक्ष एकत्र येऊन लढतील का अशीही चर्चा होती मात्र अद्याप याबाबत कसलीही चर्चा नसल्याचा निर्वाळा काल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. बिहारच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा गोंधळ समोर आला होता. तो आता सुटण्याची शक्यता आहे.

निवडणुक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे निवडणुक चिन्ह दिले होते. मात्र, या चिन्हाबाबत शिवसेनेने आपली नाराजी स्पष्ट केली होती. या चिन्हाबाबत हरकत व्यक्त करत चिन्ह बदलून मागितले होते. आता अखेर शिवसेनेच्या या मागणीचा विचार करत निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं चिन्ह दिलं आहे. आधीचे बिस्कीट हे चिन्ह मागे घेऊन शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे.

हेही वाचा - Bihar Election : शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत अद्याप चर्चा नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

शिवसेनेचे निवडणुक चिन्ह धनुष्यबाण आहे. मात्र बिहारमधील सत्ताधारी नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने शिवसेनेच्या या चिन्हावर आक्षेप घेतला होता. याचं कारण असं की जेडीयूचे निवडणुक चिन्ह हे बाण हे आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे निवडणुक चिन्ह देखील धनुष्यबाणच आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतो, असा जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत बिस्कीट हे चिन्ह देण्यात आले होते. निवडणुक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाबाबत शिवसेनेने हरकत घेतली होती. शिवसेनेला बिस्किटाऐवजी 'तुतारी वाजवणारा मावळा' हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे मंगळवारी कळवलं आहे.

हेही वाचा - चिन्मयानंदांवर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या युवतीने बदलला जबाब

ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एखादे चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी शिवसेनेने पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, ही तिनही चिन्हे आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यामुळे ती शिवसेनेला देता आली नाहीत. 

आताच्या या चिन्हावर शिवसेनेची कसलीही हरकत नसून पसंती दर्शवण्यात आली आहे. शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे कळवले आहे.