रावणाच्या लंकेत घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार: उद्धव ठाकरे

रावणाच्या लंकेत घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार: उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न'', अशी विचारणा त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

उद्धव ठाकरे सामनाच्या संपादकीयमधून म्हणाले की, विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत.

फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत भारत मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली.

धर्म आणि समाजव्यवस्था यांची गुंतागुंत इस्लाममध्ये झाल्यामुळे सामान्य मुसलमान भांबावून जातो आणि धर्माप्रमाणे समाजव्यवस्थेचे नियम अपरिवर्तनीय नसल्यामुळे त्या नियमात बदल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला तो आपल्या धर्मावरच घातलेला घाला वाटतो. पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीय लेखातून म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com