राज्यपालांनी प्रवास करण्यापेक्षा राजभवनातच रहावं, तेथेच ते जास्त सुरक्षित; संजय राऊतांचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 February 2021

महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक समोर येताना पाहायला मिळतोय. भा

नवी दिल्ली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते, यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. पण, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक समोर येताना पाहायला मिळतोय. भाजपने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारकडून झालेले कृत्य दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत राज्य सरकारला अहंकारी असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊन यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारला अहंकारी म्हणणे पोरकटपणा असल्याचं ते म्हणाले आहेत. 

जागतिक दबावासमोर झुकला सौदी अरेबिया; 1001 दिवसांनंतर महिला कार्यकर्ती हथलौलची...

सरकारकडून कायदे आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे. खाजगी कामासाठी विमान वापरताना गृह मंत्रालयाचे काही नियम आहेत, त्याचेच सरकारने पालन केले आहे. सरकारी कामासाठी राज्यपालांना विमान वेळोवेळी पुरवलं गेलं. पण, खासगी कामासाठी त्याचा वापर करणे नियमात बसत नाही. त्यामुळे त्यांना परवानगी नाकारणे चुकीचं नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी देवेंद्र फडवणीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्य सरकारला अहंकारी म्हणणे हास्यास्पद आहे. शेतकरी कायद्यावरुन केंद्र सरकार दाखवत असलेला कठोरपणा अहंकार नाही का, असा सवाल करत त्यांनी टीका केली आहे. 

अहंकाराचा प्रश्न येतो कुठे? नियमांचे पालन करणे अहंकार आहे का? नियमानुसार त्यांना विमान मिळालेलं नाही. खासगी कामासाठी कोणालाही सरकारी सुविधा वापरता येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनाही ही सुविधा घेण्याचा अधिकार नाही, असं राऊत म्हणाले.  आम्ही राज्यपालांचा आदर आणि सन्मान राखतो. ते आमचा किती आदर राखतात ती वेगळी गोष्ट.  राज्य सरकारने संविधान, कायद्याचा सन्मान राखला आहे. राज्यपालांचे वय पाहता, त्यांनी कोरोनाच्या संकटात राजभवनातच रहावे. ते राजभवनातच जास्त सुरक्षित आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. 

कोश्यारींचे विमान जमिनीवर ते सुप्रीम कोर्टाचा पालकांना धक्का; महत्त्वाच्या...

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्या शासकीय विमानास मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगीच मिळाली नसल्याची बाब समोर आली.  महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल हे विमानात बसलेही होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून राज्यपालांना पुन्हा राजभवनात यावं लागलंय अशी देखील माहिती मिळतेय. या घटनेनंतर आता महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक येत्या काळात पाहायला मिळू शकतो. आधीच महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद आमदारांच्या नेमणुकीवरून राज्य विरुद्ध राज्यपाल हा वाद चांगलाच चिघळला आहे. राज्यपालांनी विधानपरिषेदच्या 12 जागांबाबत आता अंत पाहू नये, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भाष्य केलं होतं. आज समोर येणाऱ्या घटनेनंतर आता भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार हा वाद अधिक चिघळणार असं बोललं जातंय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena sanjay raut criticize maharashtra governor bhagat sinh koshayari