
"मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा"; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारनं मोठा झटका दिला आहे. डॉमिनिकातील स्थानिक कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान डॉमिनिका सरकारनं चोक्सीची याचिका सुनावणी योग्य नसून त्याला भारताकडे सोपवण्यात यावं असं म्हटलं आहे. (Shock to Mehul Choksi Dominican gov request court hand over to India)
सुनावणीपूर्वी मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं की, "माध्यमातील वृ्त्तात म्हटलंय की, मेहुलचा भाऊ डॉमिनिकात विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे पण ही एक अफवा आहे. मेहुलचा भाऊ डॉमिनिकात हे पाहण्यासाठी आला आहे की, मेहुल चोक्सीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे की नाही."
सुनावणीपूर्वी चोक्सीच्या पत्नीने मांडली बाजू
मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "माझ्या पतीच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. ते अँटिग्वाचे नागरिक असून त्यांना बारबुडा देशाच्या संविधानानुसार सर्व अधिकार आणि सुरक्षेचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. मला कॅरेबियन देशांतील कायद्यांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही मेहुलच्या सुरक्षित आणि लवकर अँटिग्वा परण्याची वाट पाहत आहोत."
भारताकडून डॉमिनिकात पोहोचली टीम
भारतीय तपास एजन्सीजचा प्रयत्न आहे की, मेहुल चोक्सीला थेट डॉमिनिकातून भारतात आणण्यात यावं. यासाठी भारतातून अनेक पथकं डॉमिनिकात दाखल झाली आहेत. बुधवारी सुनावणीदरम्यान ईडीने डॉमिनिकाच्या कोर्टात म्हटलं की, मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक असून तो येथे गुन्हा करुन पळून गेला आहे. त्यामुळे त्याला भारताच्याच स्वाधिन करण्यात यावं.