esakal | राममंदिर बांधकामात आमदार गोरे यांनी कारसेवेने प्रायश्चित्त घ्यावे- मनीषा कायंदे
sakal

बोलून बातमी शोधा

 Jaykumar Gore

राममंदिर बांधकामात आमदार गोरे यांनी कारसेवेने प्रायश्चित्त घ्यावे- मनीषा कायंदे

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : प्रभू श्रीरामांबाबत (Shree Ram Prabhu) आक्षेपार्ह उद्गार काढणाऱ्या भाजप आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (media) प्रसिद्ध झाल्याने आता कोकणचे खासदार गोरे यांच्या श्रीमुखात लगावणार का, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी केली आहे. गोरे यांनी अयोध्येत (Ayodhya) राममंदिर बांधकामात (Shree Ram temple) कारसेवा करून प्रायश्चित्त घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा: वसईच्या कौशिक जाधव यांनी फळ-भाज्यांवर रेखाटले अष्टविनायक

रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान संघ परिवारातर्फे एक घोषणा दिली जात असे. जो नही है राम का, वो नही किसीके काम का, अशा त्या घोषणेची आठवण गोरे यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने झाली. गोरे यांना धड रामायणातील व्यक्तीरेखाही ठाऊक नसल्याचे उघड झाले आहे. भाजप-संघ परिवारातील अनेकजण स्वतःला प्रभू रामचंद्रांप्रमाणे एकवचनी म्हणवतात. त्यामुळे वरील घोषणा लक्षात घेता ते आता गोरे यांच्याबाबत काय निर्णय घेणार ते त्यांनी जनतेला सांगावे, असा टोलाही कायंदे यांनी लगावला आहे.

रामाची नियत खराब होती, असे उद्गार गोरे यांनी काल जाहीर सभेत दोनदा काढले. श्रोत्यांनी गलका करून त्यांची चूक लक्षात आणून देताच, रावणाची नियत खराब होती, अशा सारवासारव त्यांनी केली. त्यामुळे गोरे यांना रामायणातील व्यक्तिरेखांचा परिचयही नाही का, अशी टीका रामभक्त करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीमती कायंदे यांनी गोरे यांना रामायणाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा कितवा वर्धापनदिन हे ठाऊक नव्हते, असा दावा करून नारायण राणे यांनी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता गोरे यांच्याबद्दल राणे काय भूमिका घेणार, असेही कायंदे यांनी विचारले आहे.

गोरे यांच्या वक्तव्याचा शिवसेना तीव्र निषेध करीत असून भाजपच्या लोकप्रतिनिधींना रामायणाची पारायणे करण्याची गरज असल्याचा टोमणाही कायंदे यांनी मारला आहे. रामायण-महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्यांची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही. प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. ऐकिव माहितीवर आपले चुकीचे ज्ञान ( अज्ञान ) प्रदर्शित करून महापुरुषांचा अपमान करू नये, असेही कायंदे यांनी गोरे यांना बजावले आहे. रामायणाची माहिती नसलेल्या गोरे यांनी आता अयोध्येत सुरु असलेल्या राममंदिराच्या बांधकामात कारसेवा करून प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्यांनी उपहासाने म्हटले आहे.

loading image
go to top