श्याम रंगिलाचा व्हिडिओ का झोंबला? पेट्रोल पंप मालकाचं तेल होणार बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 21 February 2021

देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणं कॉमेडियन श्याम रंगीला याला चांगलेच महागात पडलंय.

नवी दिल्ली- देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणं कॉमेडियन श्याम रंगीला याला चांगलेच महागात पडलंय. याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाईची तयारी केली जात आहे. लोकप्रिय कॉमेडियन श्याम रंगीला (Shyam Rangeela) याने  श्रीगंगानगर येथील हनुमानगड रोड परिसरातील पेट्रोल पंपाजवळ  (Petrol Pump) एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून श्याम रंगीला याने इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवरची फिरकी घेतली होती. 

पेट्रोल-डिझेलच्या 'शंभरी'वर सीतारमण म्हणाल्या, 'माझं उत्तर...

पेट्रोल पंप मालकाने श्याम रंगिलाला पंपावर व्हिडिओ शूट करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे एका खासगी तेल कंपनीने पंप मालकाला श्याम रंगिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं असल्याचं कळतंय. असे न केल्यास तेल न देण्याचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रंगिलाने म्हटलंय की, 'कंपनीला असं काय झोंबलं की, ज्यामुळे पंप मालकाला तेल पाठवले जात नाहीये. मी असं काय म्हटलं, ज्यामुळे कंपनीच्या भावनांना ठेस लागली. कोणती अशी तुमची असहाय्यता आहे, तुम्हाला माफी नाही तर कारवाई हवी आहे. ठीक आहे तर मग करा कारवाई'.

श्याम रंगिला काय म्हणाला

व्हिडिओ बनवण्यामागे माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत, सरकार यावर काही दिलासा द्यावा यासाठी मी व्हिडिओ बनवला होता, असं श्याम रिंगालाने म्हटलंय. विशेष म्हणजे त्याने मोदींची नक्कल करत देशात सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीवर भाष्य केले होते. श्याम रंगीलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. 

श्याम रंगीलाने  16 फेब्रुवारीला सोशल प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अल्पावधीत याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. व्हिडिओमध्ये मजेशीर अंदाजात श्याम रंगीलाने पंतप्रधान मोदी यांची मीमिक्री केली होती. या ठिकाणी पेट्रॉलच्या किंमतीने 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. भाई-बहनो स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशी कोणतेच सरकारला जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. पेट्रोलला त्याची योग्य किंमत आम्ही मिळवून दिली, या आशयाचे भाष्य श्याम रंगीला याने संबंधित व्हिडिओमध्ये केले होते.  या व्हिडिओमुळे श्याम रंगीला याच्या अडचणी वाढल्यात. 

ज्या पंपाजवळ श्याम रंगीला याने व्हिडिओ शूट केला त्या पंप मालकाने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. श्याम रंगीला याने कॉल केला होता. स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगत त्याने पेट्रोल पंपाजवळ फोटो काढण्याची परवानगी मागितली होती, असा आरोप पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shyam Rangeela Petrol Pump petrol diesel price rate hike police complaint