सिद्धूने माझे उदाहरण देणे थांबवावे : किरण खेर

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या "द कपिल शर्मा शो' या टीव्ही शोमध्ये सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना सिद्धूने अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांचे उदाहरण दिले आहे. त्यावर "सिद्धूने माझे उदाहरण देणे थांबवावे', असे आवाहन खेर यांनी केले आहे.

नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या "द कपिल शर्मा शो' या टीव्ही शोमध्ये सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना सिद्धूने अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांचे उदाहरण दिले आहे. त्यावर "सिद्धूने माझे उदाहरण देणे थांबवावे', असे आवाहन खेर यांनी केले आहे.

खेर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "मी मंत्री नाही आणि गेल्या तीन वर्षांपासून चित्रपटात काम करणे थांबविले आहे. इतर सदस्यांपेक्षा माझी संसदेतील उपस्थिती अधिक आहे. मी सर्व राजकीय चर्चांमध्ये हिरीरीने सहभागी होते. मी चंदीगढमध्ये राहते आणि कलर्स वाहिनीवरील "इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमासाठी मुंबईत प्रवास करते. तो तीन महिन्यांचा कार्यक्रम असतो. मात्र त्यासाठी मी केवळ 21 दिवसच काम करते. त्यामुळे माझे दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होत नाही. ऑक्‍टोबरमध्ये ज्यावेळी संसदेचे सत्र नव्हते, त्यावेळी कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण झाले होते.'

विनोदी अभिनेता कपिल शर्मा यांच्या टीव्ही शो मध्ये सिद्धू सहभाग घेतात. मात्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी सहभाग घ्यावा का याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला मागितला आहे. दरम्यान पंजाबच्या महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी "मला वाटते हे अगदी स्पष्ट आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती घटनात्मक पद्धतीने मंत्रीपदाची शपथ घेतो, त्यावेळी त्याला कोणत्याही खाजगी पदावर काम सुरू ठेवता येत नाही' असे स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिद्धू यांनी कुटुंबाच्या निर्वाहासाठी टीव्ही शोमध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी किरण खेर यांचे उदाहरण दिले आहे. किरण खेर या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या टीव्ही कार्यक्रमात सहभाग घेतात.

Web Title: Sidhu should stop citing me as example : Kiron Kher