तुरुंगावरील हल्ल्यात दहशतवाद्यांसह सहा फरार

पीटीआय
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पतियाळा - पोलिसांच्या गणवेशात आलेल्या शस्त्रधारी हल्लेखोरांनी आज भरदिवसा अतिसुरक्षित नभा तुरुंगावर हल्ला करत खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा प्रमुख हरमिंदर मिंटू याच्यासह सहा कैद्यांना पळवून नेले. या धक्कादायक घटनेनंतर पंजाब सरकारने तातडीने तुरुंग महासंचालक आणि इतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

पतियाळा - पोलिसांच्या गणवेशात आलेल्या शस्त्रधारी हल्लेखोरांनी आज भरदिवसा अतिसुरक्षित नभा तुरुंगावर हल्ला करत खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा प्रमुख हरमिंदर मिंटू याच्यासह सहा कैद्यांना पळवून नेले. या धक्कादायक घटनेनंतर पंजाब सरकारने तातडीने तुरुंग महासंचालक आणि इतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या युवकांच्या एका गटाने हा हल्ला केला. यानंतर सहा कैद्यांना घेऊन ते पळून गेले. हरमिंदर मिंटू याच्यासह विकी गुंदर, गुरप्रित सेखोन, नीता देओल, अमनदीप धोतियॉं आणि विक्रमजित अशी तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. मिंटूला पोलिसांनी 2014 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक केली होती. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिमसिंग यांच्यावरील हल्ल्यासह एकूण दहा आरोपांखाली ही अटक झाली होती. हवाई दल केंद्रावर स्फोटके नेल्याचाही मिंटूवर गुन्हा आहे. या घटनेनंतर पंजाब आणि हरियानामध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असून, रेल्वे स्थानके, विमानतळ, बस स्थानके आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तुरुंग महासंचालकांसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे. या घटनेबाबत केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे अहवाल मागितला आहे.

कैद्यांना शोधण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न सुरू केले असले, तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचाच हा परिणाम असल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा हिंसाचार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

25 लाखांचे इनाम जाहीर
तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांना पकडण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, सर्व ठिकाणी शोधमोहीम सुरू केली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी सांगितले. तसेच अतिरिक्त अतिरिक्त मुख्य सचिव जगपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली असून, सुरक्षेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्याचे काम केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. याबाबतचा अहवाल तीन दिवसांत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पळून गेलेल्यांची माहिती देणाऱ्यांसाठी राज्य सरकारने 25 लाख रुपयांचे इनामही जाहीर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही पंजाब पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली आहे.

भरदिवसा झालेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे. मुख्यमंत्री बादल यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुरक्षेची स्थिती ढासळल्याचे हे निदर्शक आहे.
- कॅप्टन अमरिंदरसिंग, कॉंग्रेस नेते

गोळीबारात महिलेचा मृत्यू
कैदी पळून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी सुरू केली. या वेळी एका तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी एका मोटारीला थांबण्याचा इशारा करूनही चालकाने ती थांबविली नाही. ही गाडी ठाणे अंमलदाराची होती. पोलिसांनी या मोटारीच्या दिशेने गोळीबार केल्याने गाडीत असलेल्या एका महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला.

Web Title: Six prisoners escaped from jail in Punjab