धक्कादायक! UP मध्ये चिमुरडीवर बलात्कारानंतर जादुटोण्यासाठी काढली फुफ्फुसे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

पोलिसांनी म्हटलंय की जादूटोणा करण्यासाठी गुन्हेगारांनी या मुलीचे दोन्ही फुफ्फुसे काढून टाकली

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील दिवाळीच्या दिवशी गायब झालेली सहा वर्षांच्या मुलीबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चिमुरड्या मुलीवर सामुहीक बलात्कार करुन तिला ठार करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर जादूटोण्यासाठी तिची फुफ्फुसे देखील काढून टाकण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा - आमदार निवडून आणा आणि इनोव्हा कार जिंका; भाजपची नवी स्कीम

याबाबत सविस्तर माहिती पोलिसांनी दिलीय. त्यांनी म्हटलंय की जादूटोणा करण्यासाठी गुन्हेगारांनी या मुलीचे दोन्ही फुफ्फुसे काढून टाकली. एका महिलेला मूल जन्माला घालण्यासाठी मदत व्हावी म्हणून करण्यात आलेल्या जादूटोण्यासाठी हे फुफ्फुस उपयोगी पडतील असं आरोपींची समजूत होती. वरिष्ठ पोलिस अधिक्षक ब्रजेश श्रीवास्तव यांनी माहिती दिली की, मुख्य आरोपी परशुराम कुरील याला जादूटोणा करण्यासाठी अंकूल कुरील (20) आणि बीरन (31) यांच्याकडून यांनी हे फुफ्फुस दिले होते ज्यांना आता अटक करण्यात आली आहे. परशुराम यांना काल सोमवारी कस्टडीत घेण्यात आलं आहे. यासोबतच सगळं माहित असतानाही त्याची कुणाकडेही वाच्यता न केल्याबद्दल परशुरामच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरवातीला परशुराम याने पोलिसांना चकवा द्यायचा प्रयत्न केला मात्र सखोल चौकशीअंती त्याने सरतेशेवटी आपला गुन्हा कबूल केला. त्याचं 1999 साली लग्न झालं होतं पण त्याला मूल होत नव्हतं. आणि म्हणूनच जादूटोणा करुन आपल्याला मूल होईल अशा अंधश्रद्धेपोटी त्याने आपल्या पुतण्या अंकूल आणि त्याचा मित्र बीरन यांना एका सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिचे फुफ्फुस काढून आणण्यास सांगितले. संपूर्णत: दारुच्या नशेत असणाऱ्या या दोन आरोपींनी या मुलीचे अपहरण केलं आणि तिला मारण्यापूर्वी तिच्यावर सामुहीक बलात्कार केला. 

हेही वाचा - भाजप खासदाराच्या नातीचा फटाके उडवताना भाजून मृत्यू

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या खटल्याची कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या चिमुरडीच्या कुंटुंबियांना आधार म्हणून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Year Old Girl Gangraped her Lungs Taken Out To Perform Black Magic