आमदार निवडून आणा आणि इनोव्हा कार जिंका; भाजपची नवी स्कीम

bjp
bjp

तमिळनाडू : निवडणुका जिंकण्यासाठी कुणी काय शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व प्रकारच्या युक्त्या आणि क्लृप्त्या वापरुन निवडणुकीत बाजी मारण्यासाठी लोक प्रयत्नशील असतात. अशीच एक क्लृप्ती तमिळनाडू भाजपकडून वापरली जात आहे. तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी मात्र आतापासूनच करण्यात येत आहे. या निवडणुकीत आपल्याला 25 जागा मिळाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. 

तमिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्यांनी असं जाहीर केलंय की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा उमेदवार जर जिंकून आला तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एक एक इनोव्हा कार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी आपल्या पक्षातील लोकांना याबाबत आश्वासन दिलं होतं. गेल्या रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या या आश्वासनाची आठवण पक्षकार्यकर्त्यांना करुन दिली. तसेच कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीच्या दृष्टीने कृतीशील होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन पहिल्यांदा दिल्याचं वृत्त द फ्रि प्रेस जर्नलने दिलं होतं. या बैठकीत निवडणुकीत जिंकण्याच्या तयारीसाठी आतापासूनच कंबर कसण्याचे आवाहन त्यांनी केलं होतं. 

पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्याला किमान 25 आमदार निवडून आणून राज्यात महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, असं म्हटलं आहे. तसेच त्यासाठी आपला आमदार निवडून आला तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला एक इनोव्हा कार देण्याचं आश्वासनही त्यांनी दिले आहे. 

तमिळनाडूमध्ये हा प्रकार सर्रास चालतो. तिथे दोन प्रमुख पक्ष द्रमुक आणि अण्णा-द्रमुक अनेकदा निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या देतात. दक्षिण भारतात भाजपचा फारसा प्रभाव नाहीये. तिथे आपले दखलपात्र अस्तित्व निर्माण व्हावे, म्हणून भाजप झटत आहे. सध्या भाजप अण्णाद्रमुक पक्षासोबत युती करुन आहे. मात्र त्यांच्यातील संबंधही नाजूक बनलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com