Bihar Election - Video : तेजस्वी यादवांवर भरसभेत फेकली चप्पल; व्हिडीओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

तेजस्वी यादव यांच्यावर एकामागोमाग एक अशा दोन चप्पला फेकल्या गेल्या.

पाटणा : बिहारमधील औरंगाबादच्या कुटुम्बा विधानसभा मतदारक्षेत्रात बभंडीमध्ये काल महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेला संबोधित करण्याआधी तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर गर्दीमधून कुणाकडून तरी चप्पल फेकली गेली. ही चप्पल गर्दीतून कुठल्या दिशेने आली आणि  कुणी फेकली याबाबत काही समजले नाही. तेजस्वी यादव यांच्यावर एकामागोमाग एक अशा दोन चप्पला फेकल्या गेल्या. यापैकी एक चप्पल त्यांच्या बाजूने जाऊन मागे पडली तर दुसरी चप्पल त्यांच्या अंगावर जाऊन पडली. तेजस्वी यादव यांनी या घटनेला विशेष महत्व दिले नाही तसेच आपल्या भाषणातदेखील या घटनेचा दुर्लक्षित करत अनुल्लेख केला. 

हेही वाचा - भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकाला रात्री पाठवले परत

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत जेडीयू-भाजप यांच्या एनडीए युतीला आव्हान दिलं आहे. तेजस्वी यादव हे या विरोधी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या शासन काळावर सडकून टीका करत तेजस्वी यादव यांनी तरुण नेतृत्वाला साथ द्या अशी बिहारच्या जनतेला साद घातली आहे. काल ते पाटण्यापासून जवळपास 125 किमी दुर असणाऱ्या औरंगाबादमधील कुटुम्बा विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी गेले होते. आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एक प्रचारसभा आयोजित केली गेली होती. ते मंचावर जाऊन बसल्यानंतर तिथे त्यांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. 
तेजस्वी यादव भाषणासाठी उठणार इतक्यातच मंचावर समोरील गर्दीतून चप्पला फेकल्या गेल्या. यातील एक चप्पल त्यांच्या अंगावर जाऊन  पडली. चपल्ला कुणी फेकल्या याबाबत संदिग्धता आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका तिनचाकी सायकलवर बसलेल्या अपंग व्यक्तीने ही चप्पल फेकली होती ज्या व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी पकडले. राजदचे प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी या घटनेचा निषेध करत नेत्यांसाठी आवश्यक ती सुरक्षा देण्याची मागणी केली. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींचे भाषण फ्लॉप; भाजपने डिस्लाईक बटण केले ब्लॉक!

तेजस्वी यादव यांनी आपल्या जाहीरनाम्यासह सगळीकडे अशी घोषणा केली आहे की, विधानसभा निवडणुकीत जिंकल्यावर त्यांचं सरकार पहिल्या कॅबिनेटमध्येच राज्यातील युवकांना 10 लाख रोजगार देण्याचा निर्णय घेईल. त्यांनी म्हटलंय की राज्यात अनेक पदे रिकामी आहेत मात्र तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी नितीश सरकारने काहीही प्रयत्न केले नसल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slippers thrown on tejashwi yadav in election rally in aurangbad