फेसबुकवर पाकिस्तानची नारेबाजी

अमृत वेताळ
शनिवार, 2 मार्च 2019

रामदुर्ग येथील शफी बेन्नी नामक तरुणाच्या फेसबुकवरुन पाकिस्तानची नारेबाजी करणारी पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. संबधीताच्या फेसबुकवर अन्य डिव्हाईसवरुन हा मजकुर अपलोड करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. आपण, स्वत: रामदुर्ग पोलीस ठाण्याला भेट देउन माहिती घेतली आहे. 
सुधीरकुमार रेड्डी, जिल्हा पोलीस प्रमुख

बेळगाव : पाकिस्तानची नारेबाजी करणारी पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी रामदुर्ग पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.1) रात्री 10 वाजता एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यापाठोपाठ गुन्हा दाखल झालेल्या इसमाने आपले फेसबुक हॅक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान ही घटना उघडकीस येताच त्याच रात्री त्या फेसबुक युजर तरुणावर काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणत दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन घेऊन तपास चालविला आहे. 

शफी बेन्नी (वय 40, रा. रामदुर्ग) असे त्या फेसबुक युजरचे नाव आहे. काल त्याच्या फेसबुकवर पाकिस्तान जिंदाबाद अशी पोस्ट करण्यात आल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणी त्याच्याविरोधात रामदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संशयिताला अटक करण्याच्या तयारीत असताना शेफी बन्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला व आपले फेसबुक हॅक झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

तातडीने हे प्रकरण पोलिसांनी सायबर सेलकडे वर्ग करुन चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधिताचा फेसबुक आयडी वापरुन दुसऱ्यानेच ती पोस्ट व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी दुसऱ्या डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. डिव्हाईसचा वापर करणारा कोण आणि ती पोस्ट कोठून अपलोड करण्यात आली आहे. याचीही चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, फेसबुक युजर शफी बन्नी या तरुणावर काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन जमावाला पांगविले आणि तणावग्रस्त परिस्थिती नियत्रंणाखाली आणली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slogans about Pakistan on Facebook