मंदीचा दणका; वाहन उद्योगाला करकचून ब्रेक!

वृत्तसंस्था
Monday, 2 September 2019

- वाहनविक्रीचा आलेख ऑगस्टमध्येही उतरताच ! 
- मारुती सुझुकी, टाटा मोटर्सला मोठा फटका 

 

नवी दिल्ली ः गेल्या काही महिन्यांपासून भयानक मंदीचा सामना करणाऱ्या वाहन उद्योगापुढील संकट अद्याप "जैसे थे' आहे. वाहनविक्रीत सातत्याने होणारी घसरण ऑगस्टमध्येही कायम राहिली असून, सरकारने केलेल्या उपाययोजना या क्षेत्रातील कंपन्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मंदीचा परिणाम; औरंगाबादमध्ये 50 हजार कामगारांची गेली नोकरी

वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने सवलतीच्या दरात वाहनकर्ज, सरकारी बॅंकांच्या माध्यमातून रोकड तरलतेत सुधारणा, वाहननोंदणी शुल्क तसेच, सरकारी विभागांसाठी नवीन वाहनांच्या खरेदीवरील बंदी मागे घेण्यासारख्या घोषणा केल्या. मात्र, त्याचा फारसा परिमाण दिसून आला नाही. ऑगस्टमध्ये मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, होंडा अशा विविध कंपन्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविली आहे. 

मंदीची भिती वाटतेय? पुणेकरांनो हे वाचा !

बाजारपेठेतील स्थिती अद्याप आव्हानात्मक आहे. किरकोळ विक्रीत तुरळत वाढ नोंदवली असल्याने कंपनीने त्यावर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे, अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारेख यांनी व्यक्त केली. 

वाहनविक्रीतील घसरण 
- मारुती सुझुकी ः 32.7 % 
- टाटा मोटर्स ः 58 % 
- होंडा कार्स इंडिया ः 51 % 
- टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ः 21 % 
- ह्युंदाई ः 16.58 % 

वाहनविक्रीतील घसरण चिंताजनक असून, सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजना वाहनखरेदीला चालना देण्यासाठी पुरेशा नाहीत. आगामी काळात सणासुदीच्या पार्श्‍वभूमिवर विक्रीत वाढ होण्यासाठी वाहनांवरील जीएसटी कपात करण्याबाबत सरकारने विचार करावा. - राजन वधेरा, "सियाम'चे अध्यक्ष

मंदी रोखण्यासाठी खासगी व्यवहाराला चालना देणे आवश्यक

मारुतीकडून उत्पादनात कपात 
बाजारपेठेतील घटलेली मागणी पाहता मारुती-सुझुकी इंडियाला ऑगस्ट महिन्यात सलग सातव्यांदा आपल्या उत्पादन कपात करावी लागली. या महिन्यात कंपनीने 33.99 टक्‍क्‍यांनी आपले उत्पादन घटवल्याची माहिती शेअर बाजारात दिली. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण 1,11,370 वाहनांची निर्मिती केली. गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा 1,68,725 इतका होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slowdown in Indian Automobile Sector