मोबाईलवर विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शिक्षण

मोबाईलवर विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शिक्षण

बेरहामपूर (ओडिशा) : ओडिशातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमाच्या शाळांमध्ये आता स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर या ऑनलाइन अध्यापन प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी आणि सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल, असे गंजमचे जिल्हाधिकारी विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले. सर्वप्रथम कुलंगे यांनीच ही स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण देण्याची संकल्पना मांडली होती. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, ते यूट्यूब आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रयोगात यश आल्यास ही व्यवस्था फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल, असेही कुलंगे यांनी स्पष्ट केले. 

घरूनही अभ्यास शक्‍य 

हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आला असून, ऑनलाइन लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यास करता येतो, त्यामुळे एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला, तरीसुद्धा त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते. केवळ गंजमच नाही, तर अन्य जिल्ह्यांमध्येही आम्ही हा प्रयोग राबविण्याच्या तयारीत आहोत, असेही कुलंगे यांनी स्पष्ट केले. 

अन्य विषयांचाही विचार 

पहिल्या टप्प्यामध्ये विज्ञान आणि गणित यांच्यासारखे विषय ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील, या विषयांच्या शिकवण्यांचे रेकॉर्डिंग सुरू असून, लवकरच पुढील वर्गातील विद्यार्थ्यांनादेखील याचा लाभ दिला जाईल. अन्य विषयदेखील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा आमचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काळानुरूप ही प्रणाली अधिकाधिक अपडेट करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com