काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी; वाहतूक विस्कळीत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

'गुरुवारपासून हवामानात सुधारणा होण्यास सुरवात होईल. त्यानंतर 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जोरदार हिमवृष्टी होऊ शकेल,' असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

श्रीनगर : जोरदार हिमवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागाचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्‍मीरमध्ये हिमवृष्टी होत आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंद आहे. मात्र, हवामानात किंचित सुधारणा झाल्याने हवाई वाहतूक सुरू झाली आहे. 

या हिमवृष्टीमुळे राज्यातील डोंगराळ प्रदेशातील काही भागातील पाणी आणि वीजेच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या हिमवृष्टीमुळे काश्‍मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

सोमवारपासून या भागात जोरदार हिमवृष्टीला सुरवात झाली. यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. 'हा महामार्ग अजूनही बंद आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत या मार्गावर आणखी वाहनांना परवानगी देणे शक्‍य नाही,' असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने काल (बुधवार) सांगितले होते. मंगळवारी श्रीनगरमध्ये केवळ एकच विमान उतरू शकले होते. पण त्यानंतर विपरित हवामानामुळे ते विमानही पुन्हा उड्डाण घेऊ शकले नाही. इतर सर्व उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. 

'गुरुवारपासून हवामानात सुधारणा होण्यास सुरवात होईल. त्यानंतर 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जोरदार हिमवृष्टी होऊ शकेल,' असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

Web Title: Snowfall continues in Kashmir valley