रामजन्मभूमी पूजनासाठी आंबेडकरांच्या जन्मगावची आणली माती 

अशोक गव्हाणे
Tuesday, 4 August 2020

राममंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येत चालू असून उद्या म्हणजेच ०५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. रामंदिराच्या कामासाठी देशातील वेगवेगळ्या २५७८ ऐतिहासिक ठिकांणावरून माती आणली आहे.

अयोध्या : राममंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येत चालू असून उद्या म्हणजेच ०५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. रामंदिराच्या कामासाठी देशातील वेगवेगळ्या २५७८ ऐतिहासिक ठिकांणावरून माती आणली आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथून माती आणली आहे. विश्व हिंदू परिषदेचे पूर्व उत्तर प्रदेश विभागाचे प्रादेशिक सचिव, अंबरिश यांनी ही माहिती दिली असून याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच मागच्या आठवड्यापासून भक्त देशातील अनेक ऐतिहासिक स्थळावरून माती आणत आहेत. यामध्ये एकोणिसाव्या शतकातील झांशी राज्याच्या राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थान असलेल्या झांशीवरून तसेच, सोळाव्या शतकातील दलित समाजाचे महान संत रविदास, पंधराव्या शतकातील संत कबीर, उत्तर प्रदेशातील देवरहा बाबा आदी महान संताच्या जन्मभूमीवरून माती आणली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

तसेच, दक्षिण भारतातीलही काही महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांवरून माती आणली आहे. ही सर्व माती कारसेवकपुरम येथे वेगवेगळ्या भांड्यात साठवण्यात येणार असून ०५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी वापरण्यात येणार आहे. सोबतच, नर्मदा, गोदावरी, ब्रम्हपुत्रा आणि गंगा या महत्वाच्या नद्यांचे पाणीही आणले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या एका सदस्याने दिली.

रामंदिरातील आणखी एका पुजाऱ्याला कोरोना

दरम्यान ०५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर भूमीपूजन सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम असून आमखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (ता.०३) सोमवारी रामलल्लाचे सहायक पुजारी प्रेम कुमार तिवारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, तसेच शुक्रवारी पुजारी प्रदीप दास आणि राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 14 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. बुधवारी अयोध्येतील रामजन्मभूमिच्या स्थळावर उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. भूमिपूजनाच्या मुहूर्तापूर्वी आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil from site of Dr babasaheb Ambedkar at Ram temple