काश्मीरमध्ये अपंग मुलाला जवानाने भरवले जेवण; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

इकबाल सिंह हे मुलासाठी पाणी घेऊन आले आणि त्याला पाजले. 'वीरता आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' हे इकबाल सिंह यांनी कृत्यातून दाखवून दिले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना दिसतात. मात्र, या जवानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जवानांमधील माणूसकी व देशप्रेम पहायला मिळेल. 31 सेकंदाच्या या व्हिडिओत एक जवान भुकेने व्याकूळ झालेल्या अपंग मुलाला जेवण भरवताना आणि त्याची काळजी घेताना दिसत आहे. हिंसेला प्रेमाने प्रत्यूत्तर देऊ शकते, हा संदेश या व्हिडिओतून मिळत आहे. हा व्हिडिओ श्रीनगरच्या नवा कदल भागातील आहे. या भागात सुरक्षिततेसाठी सीआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसणारा जवान हा 49व्या बटालियनचा हेड कॉन्स्टेबल असून, इकबाल सिंह असे त्यांचे नाव आहे.

इकबाल सिंह यांनी आपला जेवणाचा डबा उघडला त्यावेळी त्यांची नजर जवळच उभ्या असलेल्या एका अपंग मुलावर गेली. मुलगा इकबाल सिंह यांच्याकडे एकटक पाहात होता. इकबाल सिंह यांनी इशाऱ्याने मुलाला 'जेवणार का?' म्हणून विचारले. मुलाने मान हालवत होकार दिला. यांनतर इकबाल सिंह यांनी इशाऱ्याने मुलाला आपल्याकडे बोलावले. परंतु, प्रयत्न करूनही त्या चिमुरड्याला जागेवरून हलता येत नव्हते. यानंतर इकबाल सिंह यांना हा मुलगा अपंग असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्वत:च पुढे होऊन आपल्या हातांनी मुलाला जेवणं भरवले. पुढे 'पाणी पिणार?'... विचारल्यावर त्याने हसऱ्या चेहऱ्यानं होकार दर्शवला. इकबाल सिंह हे मुलासाठी पाणी घेऊन आले आणि त्याला पाजले. 'वीरता आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' हे इकबाल सिंह यांनी कृत्यातून दाखवून दिले आहे.

विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी इकबाल सिंह घटनास्थळी उपस्थित होते. घटना घडली त्यावेळी ते एक वाहन चालवत होते. सीआरपीएफच्या अनेक जखमी जवानांना उपचाराकरता हलवण्यासाठी त्यांनी मदत केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Who Survived Pulwama Terror Shares Lunch With Boy Video viral