esakal | Bihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

satyaprakash Singh

एका कुंटुंबातून एकाच व्यक्तीने राजकारणात असलं पाहिजे हाच समाजवाद आहे, असं सत्यप्रकाश यांनी म्हटलंय. 

Bihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : बिहार निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असातनाच अनेक उलथापालथी घडत आहेत. येत्या महिन्याभरातच निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आणखी एक राजकीय उलथापालथ समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे जेष्ठ सहकारी राहिलेले दिवंगत नेते रघुवंशप्रसाद सिंह नुकतेच निधन झाले होते. त्यांच्य निधनाला लालूंनी त्यांचा केलेला अपमान कारणीभूत असल्याची टीका विरोधक सातत्याने करत होते. दिवगंत नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचे चिरंजीव सत्यप्रकाश यांनी गुरुवारी जेडीयू पक्षात प्रवेश केला.

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्विकारले आहे. याआधी राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार रामा सिंह यांच्या पत्नीने महनार विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची चर्चा होती. रामा सिंह यांच्या सदस्यत्वाचा मुद्दा उचलूनच रघुवंश प्रसाद सिंह यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सत्य प्रकाश यांना पक्षात सामिल करवून घेण्यासाठी जनता दल युनायटेड पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह आणि आर सी पी सिंह पक्ष कार्यालयात उपस्थित होते.

हेही वाचा - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?

या प्रसंगी सत्यप्रकाश सिंह यांनी म्हटलं की, वडीलांकडून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांनी पुढे म्हटलं की, वडीलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना राजकारणात यावं लागलं. त्यांनी आपले वडील रघुवंश प्रसाद सिंह यांचा हवाला देत म्हटलं की, वडील नेहमी म्हणायचे की कुंटुंबातून एकाच व्यक्तीला राजकारणत असलं पाहिजे. 
सत्यप्रकाश यांनी म्हटलं की, माझ्या कुंटुंबाची पार्श्वभूमी ही राजकारणाची राहिलेली आहे. परंतु, एका कुंटुंबातून एकाच व्यक्तीने राजकारणात असलं पाहिजे हाच समाजवाद आहे. माझे वडील श्रद्धेय कर्पूरी ठाकूर यांना आदर्श मानायचे आणि त्यांच्या आदर्शांवरच चालायचे. वडीलांना मृत्यूसमयी एक पत्र लिहलंय ज्यात त्यांनी असं सांगितलंय की मी राजकारणात जायला हवं.

हेही वाचा - आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; थंडीत कोरोना बदलू शकतो रुप

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात एम्स हॉस्पिटलमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र  पाठवलं होतं. आणि त्या पत्रात त्यांनी आपल्या तीन मागण्या पुर्ण करण्याचा आग्रह धरला होता. मागच्या महिन्यात रघुवंश सिंह यांनी राजद पक्षातून राजीनामा दिला. सत्यप्रकाश यांनी म्हटलं की, त्यांनी त्यांच्या वडीलांनी दिलेले संकेत आणि त्यांचा सन्मान राखत हा पक्षप्रवेश केला आहे. असं म्हटलं जात आहे की ते महनार मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार असू शकतात.