मित्रांनो, आयुष्य एकदाच मिळते; ते आयटी श्रेत्रात वाया घालवू नका...

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

अनिकेत राजो, आयटीमध्ये काम करता करता स्वत:च्या आयुष्य विसरु नकोस. रोज थोडं जगत जा मित्रा. आयुष्य एकदाच मिळते; ते आयटी श्रेत्रात घालवू नका...

हैदराबाद: आयुष्य एकदाच मिळते; ते आयटी श्रेत्रात फुकट घालवू नका, अशी चिठ्ठी लिहून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मार्क ऍण्ड्र्यू चार्ल्स असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वाराणसी येथील मार्क हा हैदराबादमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) आयआयटीमध्ये मास्टर्स इन डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. परिक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तसेच नोकरी न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. शिवाय, चिठ्ठीमध्ये मित्रांना सल्लाही दिला आहे की, मित्रांनो, 'आयुष्य एकदाच मिळते ते आयटी श्रेत्रात फुकट घालवू नका.' मार्कच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबाद आयआयटीमध्ये मागील सहा महिन्यात विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनिरुद्ध मुम्मनैनी याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.

मार्कने आत्महत्येपूर्वी आठ पानांची चिठ्ठी लिहिली आहे, पालकांसाठी काही लिहीले असून, त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, 'मला सध्या नोकरी नाही. ती मिळण्याचीही शक्यताही नाही. कमी गुण असलेल्याला तर कोणी नोकरी देत नाही. माझ्या निकालाकडे पाहणे वेगळाच अनुभव आहे. आणखीन एक दोन अक्षर आणि तो निकालाचा कागद म्हणजे इंग्रजीतली बाराखडीच वाटेल. इतरांप्रमाणे माझीही काही स्वप्नं होती. मात्र, आता ती सर्व संपली आहेत. नेहमी हे आनंदी राहणं, चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणं, काहीच ठीक नसताना लोकांना सर्व ठिक असल्याचे सांगणे याचा मला कंटाळा आला आहे. कृपया, माझ्या शरीरावर अंत्यसंस्कार करु नका. त्याऐवजी ते एखाद्या वैद्यकीय संस्थेला दान करा. भारताच्या भावी डॉक्टरांना अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल.'

मित्रांना लिहिलेल्या चिठ्ठीत माफी मागताना म्हटले आहे, 'मित्रांनो, तुमच्या अपेक्षा मला पुर्ण करता आल्या नाहीत म्हणून मी तुमची माफी मागतो. मागील दोन महिने हे आयुष्यातील सर्वात सुंदर महिने होते. घरापासून दोन वर्ष लांब सर्वोत्तम शिक्षण संस्थेत सर्वोत्तम लोकांबरोबर राहून मी काहीच केले नाही. मी हे सर्व वाया घालवले आहे. अनिकेत राजो, आयटीमध्ये काम करता करता स्वत:च्या आयुष्य विसरु नकोस. रोज थोडं जगत जा मित्रा. आयुष्य एकदाच मिळते; ते आयटी श्रेत्रात घालवू नका...'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sorry I Turned out to Be a Waste IIT Hyderabad Student Commits Suicide