'जामिया'बाहेरील आंदोलनामुळे दिल्लीतील शाळा बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत संतप्त आंदोलकांनी चार बस पेटवून दिल्या. आंदोलकांनी केलेली दगडफेक, मारहाणीत सहा पोलिसही जखमी झाले आहेत, या राड्यामध्ये जखमी झालेल्या 35 जणांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या हिंसक आंदोलनाचे लोण राजधानी दिल्लीपर्यंत पोचले असून, जामिया विद्यापीठाच्या जवळ न्यू फ्रेंड्‌स कॉलनीमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये रविवारी रात्री झालेल्या तुफान धुमश्‍चक्रीनंतर आज (सोमवार) या भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दिल्लीतील जामिया, ओखला, न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर भागातील सर्व खासगी व सरकारी शाळा आज बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्लीतील परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत संतप्त आंदोलकांनी चार बस पेटवून दिल्या. आंदोलकांनी केलेली दगडफेक, मारहाणीत सहा पोलिसही जखमी झाले आहेत, या राड्यामध्ये जखमी झालेल्या 35 जणांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ओख्ला भागातील होली फॅमिली रुग्णालयामध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे. 

ज्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये हे आंदोलन भडकले, त्या विद्यापीठाचे शिस्तपालन अधिकारी वसीम अहमद खान यांनी पोलिसांनी बळजबरीने विद्यापीठात घुसखोरी केल्याने परिस्थिती आणखी चिघळल्याचा दावा केला. विद्यापीठाच्या कुलगुरू नज्मा अख्तर यांनीही पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रात्री उशिरा पोलिस मुख्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आले. जामियातील आंदोलनाचा परिणाम दिल्ली मेट्रो सेवेवरही झाला आहे. आश्रम, सुखदेव विहार, जामिया मिलिया, जसोला विहार, शाहीन बाग व ओखला ही सहा मेट्रो स्थानके बंद करण्यात आली. दरम्यान, जामियातील दंगलीवरून भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्षात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: southeast delhi schools to be closed on monday after clashes in Jamia Protest